कोलकाता : जे लोक भारताला आपला देश मानतात, त्यांनी गायीला आपली माता मानलेच पाहिजे, असे मत झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. तथापि, गायीच्या वा गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार केला जाऊ नये, असेही त्यांनी जोर देऊन सांगितले. गायीला वाचविण्याच्या नावाखाली अलीकडे घडलेल्या घटनांत गुरांची तस्करी करणारेही सहभागी असू शकतात, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. गोमातेला वाचविण्याच्या मुद्द्यावर संपूर्ण संघ परिवार एकत्र आहे. जे लोक भारताला आपला देश मानतात, त्यांनी गायीला आपल्या मातेसमान मानायला हवे, असेही दास यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. गोहत्या व गो-गणनेच्या मुद्द्यावर त्यांचे संघाशी मतभेद असल्याच्या चर्चेबाबत छेडले असता ते म्हणाले की, संघ परिवार या मुद्द्यावर एकत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांवर टीका केली होती. अशा प्रकारचे लोक रात्री काळे कारनामे करून दिवसा गोरक्षक असल्याचे सोंग करतात, असे मोदींनी म्हटले होते. मोदींच्या या विधानावर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी टीका केली होती.पंतप्रधानांनी जे म्हटले ते योग्यच आहे. तुम्ही कोणत्याही धर्म, जातीचे असा, मात्र गाय माता आहे आणि आम्ही गायींचे रक्षण केले पाहिजे. तथापि, कोणी गोरक्षेच्या नावाखाली हिंसाचार करीत असेल तर ते सहन केले जाणार नाही. गुरांच्या तस्करीत गुंतलेले लोकच अशा प्रकारचे गुन्हे करतात, असे मला वाटते, असेही रघुबीर दास यांनी बोलून दाख़वले. (वृत्तसंस्था)
भारताला देश मानणाऱ्यांनी गायीला माता मानलेच पाहिजे!
By admin | Published: August 21, 2016 3:41 AM