बिहारसाठी ‘इंडिया’ने ६ महिने आधीच थोपटले दंड, तेजस्वी यादव व राहुल गांधी-खरगेंची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:04 IST2025-04-16T11:59:37+5:302025-04-16T12:04:04+5:30

Tejashwi Yadav Mallikarjun Kharge India Alliance: सत्ताबदलासाठी सर्व प्रयत्न करताना जनहित डोळ्यासमोर ठेवून राजकीय धोरणाची निश्चिती करण्यावर या भेटीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

'India' slapped a fine for Bihar 6 months in advance, Tejashwi Yadav and Rahul Gandhi-Kharge discuss | बिहारसाठी ‘इंडिया’ने ६ महिने आधीच थोपटले दंड, तेजस्वी यादव व राहुल गांधी-खरगेंची चर्चा

बिहारसाठी ‘इंडिया’ने ६ महिने आधीच थोपटले दंड, तेजस्वी यादव व राहुल गांधी-खरगेंची चर्चा

नवी दिल्ली / पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए आणि काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीतील घटक पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मंगळवारी दिल्लीत राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते व राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. 

बिहारमध्ये आघाडीच्या विजयासाठी आवश्यक राजकीय गणितांवर यावेळी चर्चा झाली. सत्ताबदलासाठी सर्व प्रयत्न करताना जनहित डोळ्यासमोर ठेवून राजकीय धोरणाची निश्चिती करण्यावर या भेटीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री कोण? तेजस्वी म्हणाले, नंतर पाहू

यावेळी प्रचारात इंडिया आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, असा प्रश्न पत्रकारांनी तेजस्वी यांना विचारला. यावर कोणतेही भाष्य न करता दि. १७ एप्रिलला पाटण्यात होत असलेल्या बैठकीनंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे ते म्हणाले. 

मुख्यमंत्री सैनींच्या वक्तव्याने खळबळ; मग सावरासारव

हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी बिहारमध्ये भाजप नेते व उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी विजय खेचून आणतील, असा दावा केल्याने राजकीय खळबळ उडाली होती.

जदयू नेते नितीशकुमार यांना थेट आव्हान ठरणारे हे वक्तव्य असल्याने विरोधकांनीही हा मुद्दा तापविला होता. शेवटी जदयूने नितीशकुमार यांच्याकडेच नेतृत्व राहील, हे निक्षून सांगितले आणि चर्चेला पूर्णविराम मिळाला.

नेतृत्व नितीशकुमार यांच्याकडेच : जदयू 

बिहारमध्ये भाजपप्रणीत एनडीए एकत्रित लढणार असून, मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून नितीशकुमारच असतील, असे जनता दलाचे (युनायडेट) राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी ठासून सांगितले. सत्ताधारी आघाडीत यावरून कोणतेही मतभेद नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

Web Title: 'India' slapped a fine for Bihar 6 months in advance, Tejashwi Yadav and Rahul Gandhi-Kharge discuss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.