दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचे मार्गा आता पुन्हा एकदा वेगळे झाले आहेत. नुकत्याचा झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर, आता या दोन्ही पक्षांनी मैत्री संपवण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पार्टीने आगामी विधानसभा निवडणूक एकट्याने लढविण्यासंदर्भात भाष्य केल्यानंतर, आता काँग्रेसकडूनही जशास तसे उत्तर देण्यात आले आहे. आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीसाठीच होती, असे काँग्रेसने म्हटले आहे.
ही आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीसाठीच होती, असे दिल्ली काँग्रेसाध्यक्ष देवेंद्र यादव यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, "मी स्पष्ट करतो की, आमची आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीसाठीच होती. आम्ही हे सातत्याने म्हटले आहे की, आमची आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपर्यंतच होती.' यादव म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी I.N.D.I.A ची स्थापना करण्यात आली होती. देशाचे संविधान वाचविण्याच्या लढाईत समविचारी पक्ष एकत्रित आले होते."
देवेंद्र यादव म्हणाले, "दिल्लीमध्ये आम आदमी पक्षही आमच्यासोबत आला. आम्ही निवडणूक लढली, चांगल्या कोऑर्डिनेशनने लढली. लोकांनी हे स्वीकारले, याचा मला आनंद आहे. आमच्या मतांची टक्केवारी वाढली. आता विरोधकाची भूमिका बजावत, दिल्लीत परतू."
यादव म्हणाले, "आम्ही कालच आमच्या वरिष्ठांसोबत चर्चा केली. पुढचे दोन दिवस आम्ही सहकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. आम्ही जागा जिंकू शकलो नाही, काय कमतरता राहिली? अशा सर्व मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. आम्ही आमच्यातील कमी सुधारू, एक मजबूत विरोधीपक्ष म्हणून काम करू आणि पुन्हा एकदा दिल्लीतही काँग्रेस परत आणू.'