नवी दिल्ली : सरकार स्थापनेनंतर आता लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत लोकसभा अध्यक्षपदाची खुर्ची स्वतःकडे ठेवायची आहे. यासाठी पक्षाने एनडीएच्या मित्रपक्षांशी बोलण्याची जबाबदारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सोपविली दिली आहे. दरम्यान, २४ जूनपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनासाठी राजनाथ सिंह यांच्या घरी बैठकही झाली. संसदेचे अधिवेशन कसे चालवायचे यावर चर्चा झाली. मात्र भाजप कोणाला लोकसभा अध्यक्ष आणि कोणाला उपाध्यक्ष करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
नरेंद्र मोदी यांनी ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा तिसऱ्यांदा शपथविधी झाल्यानंतर २४ जूनपासून संसदेचे पहिले अधिवेशन सुरू होणार आहे. हे अधिवेशन आठ दिवस चालणार आहे. या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. आता २६ जूनला लोकसभा अध्यक्षपद कोणाकडे जाणार, हे ठरणार आहे. एनडीएमध्ये एकमत निर्माण करण्याची जबाबदारी भाजपने राजनाथ सिंह यांच्यावर सोपवली आहे. राजनाथ सिंह यांच्या घरी एक बैठक झाली, ज्यामध्ये जेपी नड्डा, किरेन रिजिजू, राम मोहन नायडू, चिराग पासवान आणि लल्लन सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
एनडीएतील घटक असलेल्या जेडीयूने लोकसभा अध्यक्षपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांचे म्हणणे की, एनडीएतील सर्वात मोठ्या पक्षाला लोकसभा अध्यक्षपदाचा अधिकार आहे. भाजप हा एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदावर भाजपचाच अधिकार आहे. भाजपने लोकसभा अध्यक्षांसाठी नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला आम्ही पाठिंबा देऊ. आम्ही याबाबत अगदी स्पष्ट आहोत आणि एनडीएला कोणत्याही प्रकारे कमकुवत करू इच्छित नाही, असे केसी त्यांनी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सध्या लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला आणि उपाध्यक्षपदासाठी डी पुरंदेश्वरी यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, ज्यांच्या नावाची चर्चा होते, त्यांची नावे यादीत कुठेच नसल्याचे चित्र भाजपमध्ये पाहायला मिळते. या उलट आश्चर्यकारक नावे समोर येतात. अशा परिस्थितीत लोकसभा अध्यक्षपदाच्या नावाबाबत केवळ चर्चा सुरु असल्याचे म्हटले जात आहे.
विरोधी पक्षाकडून टीडीपीला ऑफरजेडीयू आणि टीडीपीने लोकसभा अध्यक्षपदासाठी आणि उपाध्यक्षपदासाठी प्रयत्न करावेत, असे विरोधी पक्ष वारंवार सांगत आहेत. जर टीडीपीने लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार उतरवला तर इंडिया आघाडीकडून त्यांना पाठिंबा मिळेल, असा प्रयत्न आम्ही करू असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आधीच यांनी केले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत टीडीपीला इंडिया आघाडीकडून मिळालेली ऑफर भाजपाचे राजकीय गणित बिघडवेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकसभेचा नंबरगेम कसा आहे?लोकसभेचा नंबरगेम पाहिला तर भाजपाच्या नेतृत्वात एनडीएकडे २९३ खासदार आहेत. त्यात भाजपाकडे २४० खासदार आहे. त्यानंतर टीडीपी १६, जेडीयू १२, शिवसेना ७, लोक जनशक्ती पार्टी ५ खासदार आहेत. त्यानंतर इतर १० पक्षांचे १३ खासदार आहेत. तर विरोधी इंडिया आघाडीकडे २३४ खासदार आहेत. लोकसभेच्या ९९ जागांवर विजय मिळवत विरोधकांमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. त्यानंतर समाजवादी ३७, ममता बॅनर्जींची टीएमसी २९, डिएमके २२ जागांवर विजयी झाली आहे. जर टीडीपीने लोकसभा अध्यक्षपदी उमेदवार दिला तर इंडिया आघाडीचं समर्थन मिळालं तरी त्यांचा आकडा २५० जागांवर पोहचतो जो बहुमताच्या २७२ आकड्यापेक्षा कमी आहे. दुसरीकडे टीडीपीशिवायही एनडीएकडे २७७ जागांचे बहुमत राहील.