सेऊल/नवी दिल्ली : आण्विक इंधनपुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्याच्या भारताच्या प्रयत्नांना अमेरिकेनंतर फ्रान्सचाही पाठिंबा मिळाला आहे. ४८ सदस्यीय या गटाची दोन दिवसांची बैठक सेऊल येथे गुरुवारपासून सुरू होणार असून, भारताची बाजू मजबूत करण्यासाठी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर सेऊल येथे दाखल झाले आहेत. भारताला सदस्यत्व देण्याच्या मुद्यावर सदस्य देशांत मतभेद असून, चीनने भारताला सदस्यत्व देणार असाल तर पाकिस्तानलाही द्या, असे सांगून खोडा घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केली नसल्याने त्याला सामावून घेता येणार नसल्याचे चीनचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर भारत व पाकच्या सदस्यत्वाचा मुद्दा एनएसजीच्या कार्यक्रमपत्रिकेवर नाही. अण्वस्त्र तंत्रज्ञान प्रसाराबाबत भारताची पार्श्वभूमी लख्ख आहे. तथापि, चीन दोन्ही देशांची सांगड घालण्याचा खटाटोप करीत आहे. दरम्यान, एनएसजीची प्रक्रिया नाजूक आणि गुंतागुंतीची असून, भारताला संधी मिळण्याच्या शक्यतेबाबत तर्कवितर्क लढविले जाऊ नयेत, असे नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. अण्वस्त्र नियंत्रणप्रणालीतील भारताचा सहभाग संवेदनशील वस्तूच्या निर्यातीला अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरेल, असे सांगून फ्रान्सने भारताच्या एनएसजी मोहिमेला बुधवारी पाठिंबा दर्शविला. तत्पूर्वी, अमेरिका भारत एनएसजी सदस्यत्वासाठी तयार असून, अमेरिकेच्या सहकारी देशांनी त्याच्या उमेदवारीचे समर्थन करावे, असे मंगळवारी म्हटले होते. मोदी-जिनपिंग यांची ताश्कंदमध्ये भेट होणारच्चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताश्कंद येथे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान भेट होणार असून, यावेळी भारत एनएसजी सदस्यत्वासाठी चीनकडे पाठिंब्याचा आग्रह धरण्याची शक्यता आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी गुरुवारी सांगितले की, आम्ही योग्यवेळी माहिती देऊ. उझबेकिस्तानच्या राजधानीत एससीओ शिखर परिषदेदरम्यान उभय नेत्यांची भेट होईल. जिनपिंग यांच्यासोबतच्या बैठकीदरम्यान मोदी भारताच्या एनएसजी मोहिमेसाठी त्यांच्याकडे पाठिंब्याची मागणी करतील, अशी शक्यता आहे. चीन भारताचे हे प्रयत्न उधळून लावू पाहत आहे.गुरुवारपासून सुरू होत असलेल्या एनएसजीच्या मुख्य बैठकीसाठी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर बुधवारी सेऊलकडे रवाना झाले. या बैठकीत भारताला एनएसजी सदस्यत्व मिळण्याची आशा असून, चीन या प्रयत्नात अडथळाआणत आहेत. एनएसजीची अधिकारी स्तरावरील चर्चा सोमवारी सुरू झाली. हा मोठा कट - पाकएनएसजीत भारताचा समावेश करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न चीनला लगाम घालण्यासह रशियाचा पुनर्उदय रोखण्याच्या एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा आरोप पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासीर जनजुआ यांनी केला आहे. ‘पाकिस्तान्स केस फॉर एनएसजी मेम्बरशिप’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
भारताला फ्रान्सचाही पाठिंबा
By admin | Published: June 23, 2016 1:45 AM