नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारनं देशांतर्गत हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतलाय. मंगळवारी (उद्या) रात्री १२ वाजल्यापासून देशातील हवाई उड्डाणं बंद होतील. त्यामुळे उद्या रात्री १२ च्या आधी विमानं विमानतळांवर उतरतील, अशा प्रकारची योजना विमान कंपन्यांना आखावी लागेल. सरकारनं याआधीच रेल्वे वाहतूक रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं हे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. देशात दररोज जवळपास ६५०० विमानांची उड्डाणं होतात. ही उड्डाणं देशांतर्गत स्वरुपाची असतात. यामधून वर्षाकाठी १४४.१७ मिलियन प्रवासी प्रवास करतात. मात्र आता कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता देशांतर्गत हवाई उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. देशात आतापर्यंत कोरोनाचे चारशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा ५० नं वाढलाय.
Coronavirus: आता देशांतर्गत विमान उड्डाणंही बंद; कोरोनाला रोखण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 6:09 PM