नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून आल्यानं केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनहून भारतात येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २२ डिसेंबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल. हा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत लागू असेल.
ब्रिटनमध्ये हाहा:कारकॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रिया, चिली, बग्लेरिया आणि दक्षिण अरबकडून ब्रिटनच्या प्रवासावर बंदीची घोषणा केली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे दक्षिण इंग्लंडमधील बाजार ख्रिसमस आधीच बंद करण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनमध्ये चतुर्थ श्रेणीच्या कडक लॉकडाउनची घोषणा बोरिस जॉन्सन यांनी केली आहे.
नव्या स्ट्रेनमुळे संसर्गाची तीव्रता ७० टक्क्यांनी वाढलीब्रिटनमध्ये आढळलेला नवीन स्ट्रेन पूर्वीच्या रूपांपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली. याचा अर्थ असा आहे की नवीन विषाणू पूर्वीच्या विषाणूपेक्षा त्वरीत संसर्ग पसरवतो. लोकांना दिले जात असलेली कोरोनाची लस नवीन स्ट्रेनविरूद्ध लढण्यातदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि शरीरावर प्रभावी ठरेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रसार झाल्यामुळे ब्रिटन सरकारने नाताळच्या खरेदीसाठी तसंच सण साजरा करण्यावर अनेक निर्बंध घातले आहेत.