तेलंगणात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान, तेलंगणात भाजप नेते आणि निजामाबादचे खासदार डी.अरविंद यांचे एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. लोक इतर कोणत्याही पक्षाला मतदान करू शकतात किंवा नोटा बटण दाबू शकतात, परंतु निवडणूक मीच जिंकणार, असे विधान डी.अरविंद यांनी पत्रकार परिषदेत केले. याबाबत सत्ताधारी भारत राष्ट्र समितीने (BRS) राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
भाजप नेते डी.अरविंद यांच्या या वक्तव्यानंतर बीआरएस नेत्यांनी पुन्हा ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, लोकसभा सदस्याविरोधात तक्रार नोंदवून सत्ताधारी पक्षाने या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. पत्रकार परिषदेत भाजप खासदार डी. अरविंद म्हणाले, "तुम्ही तुमचे मत इतर कोणत्याही पक्षाला दिले तरी मी जिंकेन. तुम्ही काँग्रेसला मत दिले तरी कमळाचा विजय होईल".
डी. अरविंद यांचा हेतू दुसरा काही नसून निवडणुकीत मतदान करताना एखाद्या व्यक्तीने कोणतेही बटण दाबले तर मत भाजपलाच मिळेल, असाच आहे, असे बीआरएस पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर भाजप खासदाराचे स्पष्टीकरणही समोर आले आहे. डी. अरविंद यांनी आपल्या या वक्तव्यानंतर स्पष्टीकरण दिले आहे. पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, "नोटा, काँग्रेस किंवा बीआरएसचे बटण दाबले तरी मतदारसंघातील विकासकामांमुळे आपला विजय निश्चितच होईल."
दरम्यान, देशात आधीच ईव्हीएमवरून वाद निर्माण झाला होता. यात आता भाजप खासदाराच्या या वक्तव्यानंतर या प्रकरणाला अधिक महत्त्व मिळू शकते. विरोधी पक्ष मागील निवडणुकीतही ईव्हीएममधील गैरप्रकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अशा स्थितीत डी. अरविंद यांचे हे विधान भाजपसाठी अडचणीचे ठरू शकते.