नामदेव मोरे, लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: जगाचा पुरवठादार असलेल्या भारतावर पुन्हा एकदा गहू आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. गतवर्षी निर्यात तब्बल ९६ टक्के घटली असून, आयात ८५ टक्के वाढली आहे. जगातील ७१ देशांमध्ये गहू निर्यात केला जात होता, ही संख्या आता १२वर आली आहे. २०२४ - २५ या आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत तब्बल ३०३०१ टन गहू आयात करावा लागला असून, वर्षभरात हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.
रशिया व युक्रेन युद्धानंतर जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय गव्हाला प्रचंड मागणी वाढली होती. २०२१ - २२ या आर्थिक वर्षामध्ये भारताने जगातील ७१ देशांना ७२ लाख ३९ हजार टन गहू निर्यात केला होता.
निर्यातीमधून १५,८४० कोटींची उलाढाल झाली होती. २०२२ - २३ या वर्षात पुन्हा निर्यात घटण्यास सुरुवात झाली. २०२३ - २४ या आर्थिक वर्षात देशातील घटलेले उत्पादन व लोकसभा निवडणूक यामुळे गहू निर्यात बंद केली. यामुळे एका वर्षात तब्बल ९६ टक्के निर्यात कमी झाली.
संपूर्ण वर्षात १२ देशांना फक्त १,८८,२८७ टन निर्यात झाली व उलाढाल ४७० कोटींवर आली. या आर्थिक वर्षामध्येही निर्यातीऐवजी गहू आयात वाढवावी लागत आहे. गतवर्षी १,०३,६०१ टन आयात करावी लागली होती. या वर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तब्बल ३०,३०१ टन आयात करावी लागली आहे.
मागणी वाढली होती, पण...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य व्यापाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, तीन वर्षांपूर्वी रशिया व युक्रेन युद्धामुळे जगभर भारतीय गव्हाला मागणी वाढली होती. पण, उत्पादन वाढविण्यात अपयश आल्यामुळे निर्यात घटली आहे. जागतिक बाजारपेठ गमावण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.
तीन वर्षांतील गहू निर्यातीचा तपशील
वर्ष - निर्यात (देश) - निर्यात (टन) - उलाढाल (कोटी)२०२१-२२ ७१ ७२३९३६६ १५८४०२०२२-२३ ५० ४६९३२६४ ११८२६२०२३-२४ १२ १८८२८७ ४७०
तीन वर्षांतील गहू आयातीचा तपशील
वर्ष आयात (टन) किंमत२०२०-२१ ०२ १ लाख २०२१-२२ ५४ १८ लाख २०२२-२३ १३५७१ ४६ कोटी २०२३-२४ १०३६०१ ३१२ कोटी२०२४ (एप्रिल ते जून) ३०३०१ ८९ कोटी