I.N.D.I.A. आघाडीमध्ये पंतप्रधानपदावरून जोरदार रस्सीखेच, शर्यतीत कोण पुढे, मिळताहेत असे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 11:25 AM2023-08-28T11:25:20+5:302023-08-28T11:25:59+5:30
INDIA Alliance: विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची पुढील बैठक ही ३१ ऑगस्ट १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. मात्र या बैठकीपूर्वी इंडिया आघाडीत पंतप्रधानपदासह महत्त्वाच्या पदांवरून रस्सीखेच सुरू झाली आहे.
गेल्या ९ वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीची पुढील बैठक ही ३१ ऑगस्ट १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. मात्र या बैठकीपूर्वी इंडिया आघाडीत पंतप्रधानपदासह महत्त्वाच्या पदांवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. काँग्रेसकडून पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचं नाव पुढे केलं जात आहे. तर जेडीयूकडून नितीश कुमार आणि समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव यांचं नाव पुढे करण्यात येत आहे. त्याशिवाय इतर पक्षही आपापल्या नेत्यांच्या नावांची दावेदारी करत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राहुल गांधी यांचं नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केलं आहे. तर समाजवादी पक्षाने पंतप्रधानपदासाठी इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांची नावं पंतप्रधानपदासाठी समोर करत अखिलेश यादव यांच्या नावाचीही दावेदारी सांगितली आहे.
दरम्यान, भाजपाने इंडिया आघाडीतील रस्सीखेचीवर टिप्पणी करताना नितीश कुमार हे इंडिया आघाडीमध्ये साईडलाईन झाले आहेत, असा टोला लगावला आहे. भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांनी सांगितले की, नितीश कुमार यांचं स्वप्न भंगलं आहे. इंडिया आघाडीकडून राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, हे आता एक प्रकारे निश्चित झाले आहे. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, नितीश कुमार यांचे समर्थक पंतप्रधानपदाच्या दावेदारीचं स्वप्न पाहत आहेत. मात्र पंतप्रधानपद दूरच त्यांच्या दावेदारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. देशातील काही मोठ्या पत्रकारांनी सर्व्हे केला आहे. त्या सर्व्हेमध्ये ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल हे शर्यतीमध्ये आघाडीवर आहेत. मात्र नितीश कुमार यांचं नाव कुठेच नाही आहे.
याशिवाय नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या केलेल्या बिचारा अशा उल्लेखावरूनही सुशील कुमार मोदी यांनी निशाणा साधला आहे. नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांना बिचारा बनवलं आहे. चार-चार प्रकरणात शिक्षा झाली आहे. ही शिक्षा कुणामुळे झाली तर ती नितीश कुमार आणि ललन सिंह यांच्यामुळे झाली. आज लालूंच्या आजारपणाचं जर काही कारण असेल तर ते नितीश कुमार आहेत. नितीश कुमार यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आम्ही बनावट कागद पत्रांच्या आधारावर लालू यादव यांना फसवलं, असं सांगून माफी मागावी. जर लालू प्रसाद यावद निर्दोष असतील तर त्यांना जाणीवपूर्वक शिक्षा दिली जात आहे.
मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीपूर्वी या आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच असल्याची चर्चा सुरू आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितले की, काँग्रेसकडून राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. तर बिहारमधील सत्ताधारी जेडीयूने सांगितले की, नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असावेत, असे बिहारच्या जनतेला वाटते. तर अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव हेसुद्धा स्वत:ला दावेदार मानत आहेत.