ढोलेरा (गुजरात) : देश सेमीकंडक्टर क्षेत्रात मोठी भूमिका बजावण्यास सज्ज आहे आणि ते दिवस दूर नाहीत, जेव्हा भारत या क्षेत्रात जागतिक महासत्ता बनेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला. गुजरात आणि आसाममधील १.२५ लाख कोटींच्या तीन सेमीकंडक्टर सुविधा प्रकल्पांच्या पायाभरणीप्रसंगी ते बोलत होते.
पायाभरणीनंतर पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसच्या नेतृत्वातील मागील सरकारांमध्ये क्षमता नसल्याने सेमीकंडक्टरच्या स्वप्नांना सत्यात बदलण्यात ते अपयशी ठरले, असे मोदी म्हणाले.
असे आहेत तीन प्रकल्प
गुजरातमधील ढोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्रात (डीएसआयआर) सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा, आसाममधील मोरीगाव येथे ‘आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट’ (ओसॅट) सुविधा आणि गुजरातमधील साणंद येथे ओसॅट सुविधा असे हे तीन प्रकल्प आहेत.
‘विकासाचे अनेक दरवाजे उघडतील’
देशाला सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र बनवण्याच्या आपल्या सरकारच्या वचनबद्धतेचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद मोदी यावेळी म्हणाले की, जेव्हा भारत ठरवतो तेव्हा ते केल्याशिवाय राहत नाही. चिप उत्पादनामुळे अनंत शक्यतांसह विकासाचे दरवाजे उघडतील. दोनच वर्षांपूर्वी, आमच्या सरकारने देशाचे सेमीकंडक्टर मिशन घोषित केले. त्यानंतर काही महिन्यांत आम्ही सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आणि आज आम्ही तीन प्रकल्पांची पायाभरणी करत आहोत. सेमीकंडक्टर उत्पादनात भारत आधीच दशके मागे पडलेला आहे, परंतु यापुढे एक क्षणही गमावणार नाही, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
देशाला नेईल स्वावलंबनाकडे
२१ वे शतक हे तंत्रज्ञानावर चालणारे शतक आहे आणि इलेक्ट्रॉनिक चिपशिवाय आपण त्याची अजिबात कल्पना करू शकत नाही. ‘मेड इन इंडिया’ आणि ‘डिझाइन इन इंडिया’ चिप भारताला स्वावलंबनाकडे नेईल. ४०,००० हून अधिक परवानगी काढून, संरक्षण, विमा आणि दूरसंचार क्षेत्रात एफडीआय धोरणे उदार बनवून व्यवसाय सुलभ करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आणि धोरणांचा देशाला धोरणात्मक फायदा मिळेल. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
चिप कशासाठी उपयोगी?
- कार, कम्प्युटर, टीव्ही, मोबाइल, गॅझेट्स, स्पीकर्स, रेल्वे, स्मार्ट बल्ब, माईक, कॅमेरे आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी सेमीकंडक्टर चिप मेंदूप्रमाणे काम करते. उपकरणांतील ऑटोमेशनसाठी चिप हा सर्वांत महत्त्वाचा घटक असतो.
- सिलिकॉनपासून बनवलेली ही चिप एटीएम, हेल्थकेअर, ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीतील अनेक उपकरणांमध्ये वापरली जाते.
- इंटेल, सॅमसंग, तैवान सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, ब्रॉडकॉम आणि एविडिया या चिप निर्माण करणाऱ्या आघाडीच्या कंपन्या आहेत.
- आजही चीन हा जगातील सर्वांत मोठा सेमिकंडक्टर उत्पादक देश आहे. यातील संशोधनात अमेरिका अग्रभागी आहे. असेम्ब्ली आणि पॅकेजिंगमध्ये तैवान आघाडीवर आहे.