बडोदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातमधील वडोदरा येथे भारतीय हवाई दलासाठी सी-२९५ लष्करी कार्गो विमाने तयार करण्यासाठी एका प्रकल्पाची पायाभरणी केली. भारत आता कार्गो विमानाचा प्रमुख उत्पादक होईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले, तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या विमानांचे उत्पादन टाटा समूह आणि एअरबस यांच्या सहकार्याने होईल.
देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे, ज्यामध्ये खासगी कंपनीकडून लष्करी विमानाची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पात तयार होणारी मध्यम कार्गो विमाने भारतीय हवाई दलाला पुरवली जातील. याशिवाय ही विमाने परदेशी बाजारपेठेतही पाठवली जाणार आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताने हवाई दलाच्या अप्रचलित वाहतूक विमान ॲव्हरो- ७४८च्या जागी ५६ सी - २९५ विमाने खरेदी करण्यासाठी एअरबस डिफेन्स ॲण्ड स्पेससोबत २१ हजार ९३५ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली.
१६ विमाने हवाई दलाला देणार
या करारानुसार, सप्टेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२५ दरम्यान उड्डाणासाठी तयार असलेली १६ विमाने भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केली जातील. त्याच वेळी, भारतात स्थानिक पातळीवर बनवले जाणारे पहिले सी-२९५ विमान सप्टेंबर २०२६ पर्यंत वडोदरा उत्पादन प्रकल्पात तयार होण्याची शक्यता आहे. उर्वरित ३९ विमाने ऑगस्ट २०३१पर्यंत तयार करण्याचे लक्ष्य आहे.
विमानाची वैशिष्ट्ये
या प्रकल्पांत तयार केलेली विमाने अत्याधुनिक धावपट्ट्यांबरोबरच अर्धवट धावपट्टीवरूनही उड्डाण करण्यास सक्षम असतील. भारतीय हवाई दलाला मिळालेली सर्व सी-२९५ विमाने स्वदेशी इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीने सुसज्ज असतील आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडद्वारे संयुक्तपणे विकसित केली जातील. एअरबसचे हे मध्यम कार्गो विमान प्रथमच युरोपबाहेरील देशात बनवले जाणार आहे. भारतीय हवाई दलाला विमानाचा पुरवठा केल्यानंतर, एअरबसला उत्पादित विमाने इतर देशांत विकण्याची परवानगी दिली जाईल. त्यासाठी एअरबसला भारत सरकारकडून मान्यता घ्यावी लागेल.