भारताला मिळणार आणखी 12 चित्ते, Kuno National Park मध्ये तयारी पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 01:30 PM2022-12-04T13:30:53+5:302022-12-04T13:32:11+5:30
भारतातील चित्त्यांची संख्या होणार 20. नामिबियानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते येणार.
Kuno National Park: श्योपूरच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून 8 चित्ते आल्यानंतर आता याच महिन्यातच दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्याची तयारी सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वन आणि पर्यावरण मंत्री बार्बरा क्रेसी यांनी प्रोजेक्ट चीतासाठी भारतासोबत सामंजस्य कराराला मान्यता दिली आहे. कागदपत्रे आता अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याकडे आहेत. येत्या काही दिवसांत राष्ट्रपती भवनातून मंजुरी अपेक्षित आहे.
भारतात नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ते एकत्रच आणले जाणार होते. चित्यांची निवड करण्यापासून ते विलग ठेवण्यापर्यंतची तयारी नामिबिया तसेच दक्षिण आफ्रिकेत एकाच वेळी पूर्ण झाली होती, परंतु दक्षिण आफ्रिकेतून चित्ता आणण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी होऊ शकली नाही. परिणामी, नामिबियातून 8 चित्ते आले आणि दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणण्यासाठी ओळखले गेलेले 12 चिते क्वारंटाईन एन्क्लोजरमध्येच बंद राहिले.
आता सुमारे साडेतीन महिन्यांपासून ते क्वारंटाईन एनक्लोजरमध्ये बंद आहेत. दरम्यान, नामिबियातून कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेले सर्व 8 चित्ते मोठ्या आवारात स्थलांतरित झाले आहेतत त्यांनी आता भारताच्या वातावरणात स्वतःला चांगले जुळवून घेतले आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेतून चित्ता आणण्याची प्रक्रिया तीव्र झाली आहे.
नामिबियातील चित्तांचे अस्तित्व पाहून दक्षिण आफ्रिकेचा दृष्टिकोनही सकारात्मक झाला आहे आणि कालच दक्षिण आफ्रिकेच्या वन आणि पर्यावरण मंत्री बार्बरा क्रेसी यांनी चित्ता प्रकल्पासाठी भारतासोबत सामंजस्य कराराला मान्यता दिली आहे. आता राष्ट्रपतींची सही भरणे बाकी आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर चित्त्यांना भारतात आणण्यासाठी 7 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.