रशिया-युक्रेन युद्धबंदीस भारत पुढाकार घेणार?; ३ देशांचे मंत्री एकत्र बसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 08:49 AM2023-02-23T08:49:34+5:302023-02-23T08:49:59+5:30
या बैठकीत भारत युद्ध संपवण्याचा फॉर्म्युला मांडून मोठा पुढाकार घेऊ शकतो, असे मानले जात आहे
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्चच्या पहिल्या आठवड्यात ४० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी औपचारिक- अनौपचारिक चर्चा करणार आहेत. जी-२० आणि रायसीना चर्चेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीत रशिया-युक्रेन युद्धावर अधिक चर्चा होणार आहे. युक्रेन या बैठकीचा भाग नसला तरी रशियाच्या बहाण्याने यावर चर्चा होणार आहे.
या बैठकीत भारत युद्ध संपवण्याचा फॉर्म्युला मांडून मोठा पुढाकार घेऊ शकतो, असे मानले जात आहे. जी-२० हे प्रामुख्याने आर्थिक विकासाला गती देणारे व्यासपीठ आहे; परंतु, रशियावरील निर्बंध आणि भारतासारखे देश रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत राजकीय चर्चा होऊ शकते.
श्रीनगरमध्येही बैठक
श्रीनगरमध्ये जी-२०च्या पर्यटनासंदर्भात बैठक होणार आहे. त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही; पण श्रीनगरमध्ये यासाठी तयारी सुरू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मे महिन्यात बैठक होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने चीनच्या राजनैतिक माध्यमातून श्रीनगरमध्ये जी-२० बैठक रोखण्याचा खूप प्रयत्न केला होता; परंतु, तो अयशस्वी झाला.