सध्या जगभरात ChatGPT ची जोरदार चर्चा सुरू आहे. यातच आता भारत ChatGPT चे स्वतःचे व्हर्जन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या एका वक्तव्यानंतर ही चर्चांना उधाण आले आहे. सोमवारी ताज पॅलेस हॉटेलमध्ये इंडिया ग्लोबल फोरममध्ये त्यांना विचारण्यात आले की, 'भारत ChatGPT चे व्हर्जन तयार कर आहे का?' यावर वैष्णव म्हणाले, 'काही आठवडे वाट पाहा, एक मोठी घोषणा होणार आहे.' अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले की, 'तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे नाव पुढे जात आहे. एक काळ होता, जेव्हा भारत बाहेरुन तंत्रज्ञान मागवायचा. पण, आज जगातील मोठ-मोठे टेक जायंट भारतासोबत काम करू इच्छित आहेत. जगभरात भारताची बाजू मांडणाऱ्या डिप्लोमॅट्सनाही या क्षेत्रात जोडण्याची गरज आहे. भारतातील तंत्रज्ञान क्षेत्र इतके पुढे गेले आहे की, परदेशातील बँक बुडण्याचा भारतातील स्टार्टअप्सवर काहीच परिणाम झालेला नाही.'
ते पुढे म्हणाले की, 'सिलिकॉन व्हॅली बँक बुडाल्यानंतर आम्ही भारतीय स्टार्टअप्सना स्पष्टपणे सांगितले की, तुम्ही आपला पैसा भारतीय बँकांमध्ये ठेवू शकता. यासाठीची प्रक्रियादेखील एकदम सोपी केली आहे. त्यामुळे त्या बँकेचा भारतावर काही परिणाम झालेला नाही. भारत वेगाने पुढे जात आहे. आता आपण 6जी टेलिकॉम सर्व्हिसवर काम करत आहोत. 4जी आणि 5जी काळात आपण जगाचा सामना केला, आता 6जी तंत्रज्ञानात आपण जगाचे नेतृत्व करताना दिसणार आहोत,' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.