नवी दिल्ली-
इंडिया टुडे-सी वोटरनं 'मूड ऑफ द नेशन' अंतर्गत देशात केलेलं एक सर्व्हेक्षण जाहीर केलं आहे. जर आज देशात लोकसभा निवडणूक झाली तर NDA च्या खात्यात २९६ जागा मिळतील, तर UPA ला १२७ जागांवर यश प्राप्त होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लोकसभा मतदार संघांशिवाय जनतेच्या प्रश्नांबाबतही सरकारची काय प्रतिमा आहे याचाही आढावा घेण्यात आला आहे. तसंच मोदी सरकारच्या आजवरच्या अपयशांबाबतही जनतेत विचारणा करण्यात आली आहे.
सर्वेक्षणातील माहितीनुसार महागाई, शेतकऱ्यांचा मुद्दा आणि बेरोजगारी हेच मोदी सरकारसमोर सर्वात मोठे अपयशाचे मुद्दे ठरले आहेत. आकडेवारीनुसार २५ टक्के जनतेनं महागाई हेच मोदी सरकारचं अपयश ठरलं आङे. तर बेरोजगारी हा १४ टक्के लोकांना अपयशाचा मुद्दा वाटतो. शेतकरी आंदोलनाचा विचार करायचा झाल्यास १० टक्के लोकांना हे मोदी सरकारचं अपयश असल्याचं समजतात, असं सर्व्हेक्षणात दिसून आलं आहे.
कोरोना काळात महागाईचा दर सातत्यानं वाढताना दिसला. पेट्रोलपासून खाद्यपदार्थांपर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सर्वेक्षणात २५ टक्के लोकांनी वाढती महागाई हाच मोदी सरकारच्या अपयशाचा सर्वात मोठा मुद्दा असल्याचं म्हटलं आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावरुही विरोधकांनी मोदी सरकारला वारंवार धारेवर धरलं आहे. मग लोकसभा असो किंवा विधानसभा बेरोजगारीचा मुद्दा नेहमीच अग्रस्थानी असतो. या सर्वेक्षणात १४ टक्के लोक बेरोजगारी हे मोदी सरकारचं अपयश मानतात.
दरम्यान, अपयशाच्या मुद्द्यांवरुन जनतेनं आपलं रोखठोक मत व्यक्त केलेलं असलं तरी आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर विश्वास असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. देशात जर आज लोकसभा निवडणूक झाली तरी एनडीएला २९६ जागा मिळतील असा विश्वास जनतेनं व्यक्त केला आहे. म्हणजेच देशात पुन्हा एकदा बहुमताचं सरकार येऊ शकतं असा कौल दिला गेला आहे. दुसरीकडे यूपीएच्या जागांमध्येही सुधारणा झालेली दिसत आहे. पण सरकार स्थापन करण्यापासून यूपीए अजूनही दूरच असल्याचं दिसून येत आहहे. यूपीएला आज १२७ जागा मिळतील असं सर्वेक्षणातून दिसून आलं आहे.