नवी दिल्ली - सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामध्ये भारताने रशियाबाबत मवाळ भूमिका घेतली होती. त्यामुळे अमेरिका नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. दरम्यान, भारत आणि अमेरिका यांच्यात वन प्लस टू चर्चेपूर्वी अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी मोठं विधान केलं आहे. लॉयड ऑस्टिन यांनी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना सांगितले की, अमेरिका भारताच्या उत्तर सीमेवर चीनकडून केल्या जात असलेल्या कारवायांदरम्यान, भारताच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी भारतासोबत उभी राहील. यावेळी राजनाथ सिंह यांनी आपल्याकडून भारत आणि अमेरिकेकडून उच्च तंत्रज्ञान असलेली हत्यारांसह विकास आणि सहउत्पादनाच्या आवश्यकतेवर भर दिला.
यावेळी लॉयड ऑस्टिन यांनी चीन भारत आणि पॅसिफिक क्षेत्रामध्ये आपल्या शेजारील देशांच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. लॉयड ऑस्टिन यांनी राजनाथ सिंह यांना सांगितले की, बिजिंग भारताच्या सीमेवर दुहेरी उपयोग असलेल्या बांधकामांसह दक्षिण चीन समुद्रामध्ये बेकायदेशीर दावे करून हिंदी-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा नष्ट करत आहे. आम्ही तुमच्यासोबत उभे राहू, कारण तुम्ही तुमच्या सार्वभौम हितांचे रक्षण करत आहात.
यावेळी अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी युक्रेनचा प्रश्न उपस्थित करणे टाळले नाही. ते म्हणाले की, बीजिंग आपल्या शेजारी देशांच्या सुरक्षेला कमकुवत करण्याचा आणि बलप्रयोग करून यथास्थिती बदलण्याचा प्रयत्न करणारा एकमेव देश नाही आहे. युक्रेनवर हल्ला करून रशियाने जो विध्वंस घडवला आहे. तो आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे. तसेच समान विचारसरणी असलेल्या भागीदारांसोबत आम्ही सातत्याने काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असेही ऑस्टिन यांनी सांगितले.
तर भारत आणि अमेरिकेची भागीदारी हिंदी-पॅसिफिक विभाग आणि हिंदी महासागराच्या क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि विकासासाठी महत्त्वाची आहे, असे भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.