टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारत आणि बेल्जियम यांच्यात हॉकी मेन्स सेमीफायनल सामना रंगला. हृदयाची धड-धड वाढवणाऱ्या या सामन्यात बेल्जियमकडून भारताचा 5-2 या फरकाने पराभव झाला. या सामन्याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले होते. महत्वाचे म्हणजे प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हा सामना पाहिला. मात्र, टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर, ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रोल करण्यात आलं. तसेच, भारताने सामना गमावण्यास पंतप्रधान मोदीच कारणीभूत ठरल्याचं नेटीझन्सनं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामना पाहतानाच ट्विट केलं होतं. मी भारत आणि बेल्जियम यांच्यातील हॉकीचा सामना पाहत आहे, मी भारतीय संघाला शुभेच्छा देतो... असे मोदींनी म्हटले होते. मोदींच्या या ट्विटचा संदर्भ देतच त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. ट्विटरवर पनौती हा ट्रेंड सुरू झाला आहे. काँग्रेस नेते पीसी शर्मा यांनी ट्विट करुन लिहिलं आहे की, अचानक ट्विटरवर पनौती का ट्रेंड करत आहे, असं काय झालंय?. @preetiagr123 या ट्विटर हँडलवरुन लिहिण्यात आलंय की, जहाँ पडे मेरे कदम, खत्म हो गये सारे वहम... असं त्यांनी लिहंल आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामना पाहताना केलेलं ट्विट
या पराभवानंतर आता भारत कांस्य पदकासाठी खेळणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांनी भारतीय हॉकी संघाचे मनोबल उंचावत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात ट्विट करत मोदी म्हणाले, "जय आणि पराजय हा जीवनाचा एक भाग आहे. आपल्या पुरुषांच्या हॉकी संघाने #Tokyo2020 मध्ये त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली आणि हेच महत्त्वाचे आहे. टीमला पुढील सामन्यासाठी आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा. भारताला आपल्या खेळाडूंचा अभिमान आहे."
ऑलिम्पिकमधील या पुरुष हॉकी सेमीफायनलमध्ये भारत आणि बेल्जियम यांच्यात आज काट्याची टक्कर पाहायला मळाली. भारतीय पुरुष हॉकी संघाने बेल्जियमविरुद्ध जबरदस्त सुरुवात करत सुरुवातीच्याच 8 मिनिटांत दोन गोल केले होते आणि पहिल्या सत्रात भारताने 2-1 ने बेल्जियमवर आघाडी घेतली होती. मात्र, तर दुसऱ्या सत्रात बेल्जियमने 12व्या मिनिटाला गोल करत 2-2 ची बरोबर केली. मात्र, यानंतर भारताचा पराभव झाला.
अखेरची 15 मिनिटं... -भारताचा कर्णधार मनप्रीत सिंग याला पहिल्याच मिनिटाला ग्रीन कार्ड मिळाले आणि त्यामुळे भारताला 10 खेळाडूंसहच खेळावे लागले. त्यात पुढच्या मिनिटाला बेल्जियमनं पेनल्टी कॉर्नर मिळवला, त्यांचा पहिला प्रयत्न अमित रोहिदासनं हाणून पाडला. बेल्जियमनं सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळवून भारतीय संघावर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला अन् त्यांना यश मिळाले. हेंड्रीक्सनं तिसऱ्या प्रयत्नात गोल करून बेल्जियमनला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. आघाडी मिळवल्यानंतर बेल्जियमनं चेंडूवर ताबा राखण्यावर भर दिला अन् हा संघ त्यात तरबेज आहे. दबावाखाली गेलेल्या भारतीय खेळाडूंना बेल्जियमच्या आक्रमणपटूंनी चूक करण्यास भाग पाडले. पण, बेल्जियमनला सलग गोन कॉर्नर मिळूनही गोल करता आले नाही. बेल्जियमनं पुन्हा सलग दोन कॉर्नर मिळवले तेही भारतीय बचावपटूंनी रोखले. पण, 53व्या मिनिटाला बेल्जियमला स्ट्रोक्स मिळाला अन् हेंड्रीक्सनं गोल करून आघाडी 4-2 अशी भक्कम केली. आता अखेरच्या 7 मिनिटांत भारताला आव्हान कायम राखण्यासाठी दोन गोल करणे गरजेचे होते अन् ते अशक्य आव्हान भारताला पेलवलं नाही. बेल्जियमनं हा सामना 5-2 असा जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला.
ऑलिम्पिक स्पर्धेत भारत -सुवर्णपदक - 1928, 1932, 1936, 1948, 1952, 1956, 1964, 1980रौप्यपदक - 1960तिसरे स्थान - 1968, 1972