चेन्नई : सहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यामुळे तसेच तीन कोरोना चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह येताच भारतीय संघाने मंगळवारी चिदम्बरम स्टेडियमवर सरावास प्रारंभ केला. सर्व खेळाडू मैदानावर पोहोचल्यानंतर नेट सेशन पार पडले. फलंदाजांनी भरपूर फटकेबाजी केली तर गोलंदाजांनी बराच घाम गाळला.भारतीय संघातील अनेक खेळाडू कुटुंबीयांसोबत चेन्नईत आहेत. बायोबलमध्ये संघाने सराव सुरू केला. बीसीसीआयने नेट सेशन्सची छायाचित्रे ट्विटर हॅन्डलवर अपलोड केली आहेत. नेट सेशन सुरू होण्याआधी मुख्य कोच रवी शास्त्री यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले. याशिवाय संघाचा कर्णधार विराट कोहली यानेदेखील सहकाऱ्यांसोबत संवाद साधला.ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयामुळे संघात कमालीचा उत्साह आहे. विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि ईशांत शर्मा यांच्यासारखे दिग्गज खेळाडू संघाशी जुळले आहेत. या दमदार खेळाडूंच्या बळावर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध कशी कामगिरी करते, याकडे लक्ष लागले आहे. स्थानिक मैदानावर भारताचे पारडे मात्र जड मानले जात आहे. इंग्लंड संघदेखील सर्व तयारीनिशी दौऱ्यावर पोहोचला आहे. येथे येण्याआधी त्यांनी श्रीलंकेचा त्यांच्या देशात २-० ने पराभव केला. या कामगिरीच्या बळावर भारतीय खेळपट्ट्यांवरदेखील यशस्वी होण्याची संघाला आशा आहे. भारतीय संघ मात्र श्रीलंकेच्या तुलनेत सरस आहे.
India VS England :चेन्नईत टीम इंडियाचा सराव सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 5:36 AM