‘अविश्वास’वरून रंगले इंडिया Vs एनडीए युद्ध; राहुल गांधी बोलले नाहीत, सत्ताधाऱ्यांवर गुगली 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 06:24 AM2023-08-09T06:24:11+5:302023-08-09T06:24:45+5:30

विराेधक-सत्ताधाऱ्यांत धडाकेबाज चर्चा, काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी मांडला अविश्वास प्रस्ताव 

India Vs NDA War Over No confidence motion; Rahul Gandhi did not speak, Googly on the modi govt | ‘अविश्वास’वरून रंगले इंडिया Vs एनडीए युद्ध; राहुल गांधी बोलले नाहीत, सत्ताधाऱ्यांवर गुगली 

‘अविश्वास’वरून रंगले इंडिया Vs एनडीए युद्ध; राहुल गांधी बोलले नाहीत, सत्ताधाऱ्यांवर गुगली 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या वांशिक संघर्षप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी लोकसभेत मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावरील वादळी चर्चेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. मणिपूरमधील स्थितीबाबत पंतप्रधान मोदी गप्प आहे. अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून त्यांचे मौनव्रत आम्ही तोडू इच्छितो, अशी टीका काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी केली. ज्यांनी जनकल्याणाचे कार्य केले अशा गरिबाच्या पुत्राविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे अशी टीका भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केली. गरिबाचा पुत्र हा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात होता. 

लोकसभेमध्ये मोदी सरकारच्या विरोधात गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्ताव मांडला. त्यावेळी विरोधक व भाजप खासदारांमध्ये खडाजंगी झाली. अविश्वास ठरावाच्या प्रस्तावावर काँग्रेस नेते राहुल गांधी मुख्य वक्ते म्हणून बोलणार आहेत, असे कळविले असताना आयत्यावेळी त्यांचे नाव मागे का घेण्यात आले, असा सवाल केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला. 

गौरव गोगोई म्हणाले की, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या चेंबरमध्ये पंतप्रधानांनी केलेली एक टिप्पणी सभागृहासमोर आली पाहिजे. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीका करताना सांगितले की, सभागृहातील सदस्य पंतप्रधानांबद्दल निराधार दावे करू शकत नाहीत. यावर गोगोई म्हणाले की, पंतप्रधानांचे मौन राहण्याचे कारण म्हणजे गृह विभाग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांकडून झालेले दुर्लक्ष होय. आंदोलकांकडे एक-४७ पासून अनेक हत्यार असताना राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ शकत नाही का? मणिपूरमध्ये आलेली ही शस्त्रास्त्रे उद्या दुसऱ्या राज्यांमध्ये जातील. त्यामुळे देशाच्या सुरक्षेवर, अखंडतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतील. 

‘मनमोहनसिंग, अटलबिहारी वाजपेयी यांचा आदर्श ठेवा’
आसाममधील कोकराझारमध्ये २०१२ मध्ये हिंसाचार झाला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंह तिथे गेले होते. २००२ च्या गुजरात दंगलीवेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीदेखील तिथे गेले होते, याचा उल्लेख गाेगाेई यांनी केला.

गोगोईंनी विचारले तीन प्रश्न
मणिपूरमधील निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत भीषण आहे. तेथील प्रत्येक घटक न्याय- हक्काची मागणी करत आहे. मणिपूरमधील संकटाची धग देशापर्यंत पोहोचली आहे. त्याबाबत देशभरातून आवाज उठवला जात असतानाही पंतप्रधान मात्र गप्प आहेत. देशाचे एक राज्य असलेल्या मणिपूरमध्ये पंतप्रधानांना का जावे वाटले नाही? 
या मुद्द्यावर बोलायला त्यांना ८० दिवस का लागले? 
कदाचित व्हिडीओ व्हायरल झाला नसता, तर पंतप्रधान आजही गप्प राहिले असते. एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गुजरात, उत्तराखंड, त्रिपुरातील मुख्यमंत्री बदलले; पण मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांवर विशेष आशीर्वाद का?

राहुल गांधी तरी कुठे माफी मागतात?  - निशिकांत दुबे
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत विरोधकांवर खरपूस टीका केली. ते म्हणाले की, ज्यांनी जनकल्याणाचे कार्य केले अशा गरिबाच्या पुत्राविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला? मणिपूरच्या संदर्भात तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या मुद्द्याचा आधार घेताय, त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. केवळ स्थगिती दिली आहे. तुम्ही म्हणता पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प आहेत, पंतप्रधान माफी मागत नाहीत, मग तुम्ही (राहुल गांधी) कुठे माफी मागतात? सावरकरांच्या मुद्द्यावर तुम्ही माफी मागता का, तुम्ही स्वत:ची तुलना सावरकरांशी करतात, ती कधीही होऊ शकत नाही.

सलग तीन दिवस होणार चर्चा
n लोकसभेचे कामकाज मंगळवारी तहकूब झाल्यानंतर अविश्वास ठरावावरील चर्चा उद्या, बुधवारीही सुरू राहणार आहे. 
n या प्रस्तावावर लोकसभेमध्ये ८ ते १० ऑगस्ट या कालावधीत चर्चा होईल व शेवटच्या दिवशी या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देण्याची शक्यता आहे. त्यानंतर या प्रस्तावावर मतदान घेतले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या राजकारणाचे तीव्र पडसाद
केंद्रातील मोदी सरकारविरोधात लोकसभेत मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणाचे तीव्र पडसाद उमटले.

भाजपने नऊ सरकारे पाडली 
नऊ वर्षांच्या कार्यकाळात केंद्रातील मोदी सरकारने काय केले? तर अरुणाचल, उत्तराखंड, मणिपूर, मेघालय, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, पुदुचेरी आणि महाराष्ट्र या नऊ राज्यांतील सरकारे पाडली.      - सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: India Vs NDA War Over No confidence motion; Rahul Gandhi did not speak, Googly on the modi govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.