सेंच्युरियन - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. शतकवीर लोकेश राहुल आणि मयांक अग्रवालच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघ पहिल्या दिवसअखेर भक्कम स्थितीत पोहोचला आहे. पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये राहुल आणि मयांकची भागीदारी हे पहिल्या दिवसाच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले होते. दरम्यान, ही भागीदारी ज्या प्रकारे तुटली आणि ज्या प्रकारे मयांक अग्रवाल याला पायचित बाद दिले गेले त्यावरून क्रिकेटप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहेत.
भारतीय संघ जेव्हा प्रथम फलंदाजी करत होता तेव्हा डावाच्या ४१ व्या षटकात लुंगी एन्डिंगीने गोलंदाजीचा मोर्चा सांभाळला. त्याचा एक भन्नाट चेंडू मयांक अग्रवालच्या पॅडवर जाऊन लागला. त्यानंतर गोलंदाजासह क्षेत्ररक्षकांनी जोरदार अपील केली. साधारणपणे हा चेंडू लेग स्टंपबाहेर जात असल्याचे दिसत असल्याने पंचांनी मयांकला नाबाद ठरवले.
मात्र दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने थोडा विचार विनिमय करून रिव्ह्यू घेतला. त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेल्यावर सुरुवाातील चेंडू उसळी घेत लेग स्टंपच्या बाजूने जाईल असे वाटत होते. मात्र बॉल ट्रॅकिंग पाहिल्यावर तिन्ही रेड मार्क दिसले. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी मयांकला बाद ठरवले. मात्र या निर्णयामुळे मयांक अग्रवाललाही धक्का बसला.
दरम्यान, मयांक अग्रवालला सामन्यानंतर याबाबत विचारण्यात आले. तेव्हा त्याने सांगितले की, मी यावर माझं मत मांडू शकत नाही. त्यामुळे हा विषय मी टाळत आहे. कारण यावर जर मी काही बोललो तर मी बॅडबुक्समध्ये येईन. तसेच माझी मॅच फी कापली जाईल. मयांक अग्रवालने आपल्या डावादरम्यान, १२३ चेंडू खेळत ६० धावा फटकावल्या. मयांकने या खेळीमध्ये ९ चौकार ठोकले.
मयांक अग्रवालला अशा प्रकारे बाद ठरवण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. माजी क्रिकेटपटू वासिम जाफर म्हणाला की, चेंडू स्टंपला लागतच नव्हता. याबाबत अम्पायर्स कॉल हाच योग्य निर्णय होता. मयांक दुर्दैवी ठरला. जाफरप्रमाणेच अनेकांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच काहींनी हे तंत्रच चुकीचे असल्याचा दावा केला.
दरम्यान, बाद होण्यापूर्वी मयांक अग्रवाल याने लोकेश राहुलसोबत ११७ धावांची भागीदारी केली होती. २०११ नंतर दक्षिण आफ्रिकेतील भारतीय संघासाठीची कसोटीमधील ही पहिली शतकी भागीदारी ठरली होती. दरम्यान, दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी मयांक अग्रवाल याला संघात संधी मिळण्याची शक्यता कमी होती. मात्र रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने मयांक अग्रवाल याला संधी मिळाली.