ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - सध्या जी परिस्थिती आहे तशी परिस्थिती आणीबाणीच्यावेळीही नव्हती. ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय देशाला १०० वर्ष मागे घेऊन जाणारा आहे अशा शब्दात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर प्रहार केला.
दिल्लीच्या आजादपूरमध्ये त्यांनी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संयुक्त जनसभा घेत या निर्णयाचा निषेध केला. यावेळी ममता बॅनर्जींनी पंतप्रधानांवर व्यक्तीगत टीकाही केली. मोदीजी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. उद्या गुप्त मतदान घेतले तर, तुम्हाला तुमचा स्वत:चा पक्ष आणि कुटुंबियही मतदान करणार नाहीत असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
तीन दिवसात निर्णय मागे घ्या अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करु असा इशारा ममता बॅनर्जींनी दिला. भारतात फक्त ४ टक्के लोक प्लास्टिक मनी वापरतात, उरलेल्या ९६ टक्क्यांनी काय करायचं ? आज लोकांकडे भाजी विकत घ्यायला पैसे नाहीत, एटीएम आणि हिरे खाणार का ? सरकारने बँकांमधून पैसे काढण्यावर निर्बंध आणले, हे आर्थिक संकटच आहे असे ममता म्हणाल्या.