- सुशांत कुंकळयेकर, किटल (मडगाव, गोवा)
‘मेक इन इंडिया’मुळे यापुढे भारताची ओळख संरक्षण साहित्य निर्यातदार देश अशी होणार असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नवव्या डिफेन्स एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.भारतीय आरमाराची शान असलेल्या अर्जुन रणगाड्यांची प्रात्यक्षिके आणि सारंग विमानांच्या कवायतींनी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रदर्शनात ४७ देशांतील १,०५५ कंपन्यांनी भाग घेतला आहे. प्रदर्शनात तीन दिवसांत शस्त्रास्त्रांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. मागच्या वर्षी दिल्लीतील प्रदर्शनात २४ देशांतील ६२४ कंपन्यांनी भाग घेतला होता.भारताची शस्त्रास्त्र क्षेत्रातील निर्यात यापूर्वी ६०० कोटींच्या आसपास होती, आता दोन हजार कोटींवर पोहोचली आहे. भारत हा आकाश व ब्रह्मोससारखी क्षेपणास्त्रेही निर्यात करू शकेल, असा विश्वास पर्रीकर यांनी व्यक्त केला. भारताच्या शस्त्र खरेदीचा तपशील संरक्षण खात्याच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाबरोबरच संरक्षण क्षेत्राला ‘स्टार्टअप इंडिया’ या उपक्रमाशी जोडण्यात येणार आहे. संरक्षण क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीची कमाल मर्यादा ४९ टक्के आहे. मात्र, गरज पडल्यास ती वाढवण्याचा सरकार विचार करू शकते, असे पर्रीकर यांनी सांगितले.गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी डिफेन्स एक्स्पोमुळे गोव्यातील तरुणांनाही संरक्षण क्षेत्राची कवाडे खुली होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, संरक्षण राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंग, आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खा. नरेंद्र सावईकर, सेनादल प्रमुख दलबिरसिंग सुहाग, नौदलप्रमुख आर. के. धवन तसेच संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सोहळ््याला उपस्थित होते.- ४० हजार ७२५ चौरस मीटर जागेत साकारलेल्या प्रदर्शनात एकूण आठ मोठी हँगर्स उभारण्यात आली आहेत. त्यात एक हजारपेक्षा अधिक कंपन्यांची उत्पादने आहेत. अर्जुन रणगाड्याचे सुधारित रूप, टाटा कंपनीने विकसित केलेली व्हिल्ड आर्मर्ड व्हेइकल्स, तेजस विमाने आदींचे दर्शन या प्रदर्शनात होणार आहे. आगाऊ नावनोंदणी केलेल्या लोकांसाठी ३१ मार्चला प्रदर्शन खुले राहणार आहे.