नवी दिल्ली: पुढील 40 वर्षांनंतर भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश असेल, अशी आकडेवारी अमेरिकन थिंक टँक प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालातून समोर आली आहे. येत्या 40 वर्षांमध्ये जगाची लोकसंख्या कशी वाढेल, याबद्दलचा आढावा प्यू रिसर्च सेंटरकडून घेण्यात आला आहे. 2060 मध्ये सर्वाधिक मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय लोकसंख्या असलेल्या देशांची यादी प्यू रिसर्च सेंटरनं प्रसिद्ध केली आहे. सध्या सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत इंडोनेशिया प्रथम क्रमांकावर आहे. 2015 च्या आकडेवारीनुसार, इंडोनेशियात 21,99,60,000 मुस्लिम धर्मीय वास्तव्यास आहेत. या यादीत सध्या भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारतात 19,48,10,000 मुस्लिम धर्मीय राहतात. शेजारी पाकिस्तान याच यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या मुस्लिम धर्मीयांची संख्या 18,40,00,000 आहे. या यादीत बांग्लादेश चौथ्या आणि नायजेरिया पाचव्या स्थानी आहे. प्यू रिसर्चनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, 2060 मध्ये भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश होईल. 2060 मध्ये भारतातील मुस्लिम धर्मीयांची संख्या 33,30,90,000 इतकी असेल. त्यावेळी भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिम धर्मीयांचं प्रमाण 19.4 टक्के होईल. तर जगातील एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या 11.1 टक्के लोकसंख्या भारतात वास्तव्यास असेल. याचवेळी पाकिस्तानातील मुस्लिम धर्मीयांची संख्या 28.36 कोटींच्या घरात जाईल. सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत पाकिस्तान दुसऱ्या स्थानी असेल. 2060 मध्ये पाकिस्तानातील 96.5 टक्के लोकसंख्या मुस्लिम असेल. तर जगातील एकूण मुस्लिम लोकसंख्येपैकी 9.5 टक्के मुस्लिम पाकिस्तानात वास्तव्यास असतील.
40 वर्षांनंतर भारत असेल सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 3:50 PM