ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ -बोफोर्स तोफ तिच्या उपयुक्ततेपेक्षा खरेदीतील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे जास्त चर्चेत राहिली. आता ३० वर्षानंतर भारतीय लष्करात लवकरच अमेरिकन बनावटीच्या हॉवित्झरचा तोफांचा समावेश केला जाणार आहे. एम-७७७ हॉवित्झर तोफांची निर्मिती बीएई सिस्टीमने केली आहे. महत्वाची बाब म्हणजे बोफोर्स तोफाची निर्मिती करणारी स्विडीश कंपनी आता बीएईच्या नियंत्रणाखाली आहे. पुढच्यावर्षी जून महिन्याच्या मध्यावर भारतीय लष्कराच्या ताफ्यात पहिली १५५ एमएम हॉवित्झर तोफ दाखल होऊ शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अमेरिकेकडून १४५ एम-७७७ हॉवित्झर तोफांची खरेदी करण्याच्या व्यवहाराला मंजुरी दिल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली. हा ५ हजार कोटी रुपयांचा व्यवहार आहे.
या व्यवहारासाठी पेंटागॉनचे पत्र भारताला मिळाले असून, पुढच्या दोन ते तीन आठवडयात यासंबंधी करार होऊ शकतात. भारतात महिंद्रा कंपनी बीएईची व्यावसायिक भागीदार असणार आहे. करार झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात दोन होवित्झर तोफा दिल्या जातील. त्यानंतर दर महिन्याला दोन तोफा मिळतील.