नवी दिल्ली : चीन व पाकिस्तान या शेजारी देशांकडून असलेला धोका लक्षात घेता आगामी काळासाठी भारताला ताफ्यात अत्याधुनिक लढाऊ विमाने, वाहने, पाणबुड्या आणि हेलिकॉप्टर्सचा समावेश करावा लागणार आहे. ही सर्व सामग्री खरेदी करण्यासाठी भारताची योजनाही तयार आहे. अब्जावधी डॉलर्सचा हा व्यवहार प्रत्यक्षात त्याचवेळी करण्यात येईल, तसेच कंपन्या या सामग्रीची 'मेड इन इंडिया' पद्धतीने निर्मिती करतील.जगभरातील शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा आयातदार देश असलेल्या भारताने शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी नवीन धोरण आखले आहे. नव्या धोरणात संरक्षण साहित्यांची निर्मिती करणा-या कंपन्यांना भारतात येऊन कारखाने सुरू करावेत, अशी अट घालण्यात आली आहे. पाणबुड्या निर्मितीच्या कार्यक्रमासाठी पुढील जुलै महिन्यात निविदा काढण्यात येणार आहेत. या धोरणामुळे भारतात रोजगार निर्मितीला चालना मिळेल तसेच, मुख्य म्हणजे संरक्षणविषयक तंत्रज्ञान भारताला उपलब्ध होऊ शकेल. अनेक परदेशी कंपन्यांनीही नवीन धोरणानुसार भारतासाठी आणि भारतात शस्त्रास्त्रनिर्मितीमध्ये रस दाखवला आहे. युरोपियन एअरबस ही कंपनी पँथर हेलिकॉप्टर्स विकण्याचा प्रयत्न करत आहे. भारताकडून कंपनीला अब्जावधी डॉलर्सचे कंत्राट मिळाल्यास इथेच मुख्य केंद्र स्थापन करू, असे एअरबसने म्हटले आहे.दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेतील लॉकहीड मार्टिन कंपनीने भारतामध्ये एफ-१६ पद्धतीची लढाऊ विमाने बनवण्याची घोषणा केली होती. यासंदर्भात लॉकहीड मार्टिन आणि टाटा उद्योग समूहामध्ये पॅरिस एअर शोमध्ये अधिकृत करार झाला.
भारत करणार शस्त्रास्त्र सामग्रींची खरेदी, नव्या धोरणानुसार कंपन्यांवर अटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 1:19 AM