नवी दिल्ली : मॉरिशसच्या ऊर्जाविषयक गरजा भागविण्यासाठी भारत सतत पाठिंबा देत राहील, असे आश्वासन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी मॉरिशसचे उपपंतप्रधान शोकुताली सोधून यांना दिले.प्रधान यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे सोधून यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. भारताचा सार्वजनिक उपक्रम असलेली हायड्रोकार्बन क्षेत्रातील मंगलोर रिफायनरी अॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (एमआरपीएल) ही रिफायनरी २००६ पासून मॉरिशसला पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करीत आहे.हे दोन्ही देश तेल आणि वायू क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मॉरिशसची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासह आवश्यक तेल आणि वायू क्षेत्रांतील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या माध्यमातून मॉरिशसला पेट्रोलियम हब बनविण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचा प्रधान यांनी या भेटीत पुनरुच्चार केला. यावेळी सोधून आणि प्रधान यांनी हायड्रोकार्बन क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्याच्या दिशेने काम करण्याची इच्छा व्यक्त केली.सोधून हे हायड्रोग्राफीवरील संयुक्त समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आणि भारत-मॉरिशस द्विपक्षीय सागरी सहकार्य अधिक बळकट बनविण्यासाठी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यार आले आहेत. भारत आणि मॉरिशस यांचे प्राचीन काळापासूनचे सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध आहेत आणि हे द्विपक्षीय संबंध अलीकडच्या काळात अधिकाधिक दृढ बनत चालले आहेत. (वृत्तसंस्था)
ऊर्जेची गरज भागविण्यासाठी भारत मॉरिशसला सहकार्य करणार
By admin | Published: March 22, 2017 2:24 AM