नवी दिल्ली : पुढच्या वर्षी पहिल्या तीन-चार महिन्यांत देशातील लोकांना कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच, जुलै-ऑगस्टपर्यंत जवळपास २५-३० कोटी लोकांना लस देण्याची योजना आहे. त्यानुसार आम्ही तयारी करीत आहोत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.
दिल्लीतील बुरारी येथील निरंकारी समागम मैदानावर आंदोलन करत असलेल्या शेकडो शेतकऱ्यांना कोविडचे नियम पाळण्याची विनंती डॉ. हर्षवर्धन यांनी केली. यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना पुढच्या वर्षी पहिल्या तीन-चार महिन्यांत देशातील लोकांना कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे, असे सांगितले. तसेच, जुलै-ऑगस्टपर्यंत जवळपास २५-३० कोटी लोकांना लस देण्याची योजना आहे. त्यानुसार आम्ही तयारी करीत आहोत, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
याचबरोबर, आंदोलक शेतकऱ्यांना आवाहन करताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले, "माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी कोविडचे नियम लक्षात ठेवावेत. त्यानुसार वर्तन करावे. यामध्ये तोंडाला मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्यासाठी ही महत्वाची बाब आहे."
दरम्यान, देशात आतापर्यंत एकूण ९४ लाख ३१ हजार ६९२ रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासांत भारतातील ३८ हजार ७७२ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. तर ४४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, कोरोनापासून ४५, १५२ लोक बरे झाले आहेत. कोरोना साथीमुळे आतापर्यंत १ लाख ३७ हजार १३९ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत काल किंचित घट दिसून आली. रविवारी राज्यात ५ हजार ५४४ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १८ लाख २० हजार ०५९ वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात सुद्धा कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील लॉकडाऊन ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. राज्यातील कंन्टेन्मेंट झोनमध्ये म्हणजेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात हा लॉकडाऊन असणार आहे.