ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 22 - युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानला अणु हल्ला करण्याची संधी न देता भारतच आधी पाकिस्तानवर हल्ला करेल असा दावा करण्यात आला आहे. वॉशिंग्टनमध्ये 'कार्नेगी इंटरनॅशनल न्यूक्लिअर पॉलिसी कॉन्फ्रेन्स'दरम्यान हा दावा करण्यात आला. दक्षिण आशियातील आण्विक क्षेत्रातील तज्ञ विपुल नारंग यांनी हा दावा केला.
अणु हल्ला न करण्याच्या धोरणामध्ये बदल करून भारतच आधी पाकिस्तानवर हल्ला करेल असा त्यांचा दावा आहे. नारंग हे मेसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये दक्षिण आशियातील आण्विक धोरणाविषयीचे तज्ञ आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये तशी परिस्थिती उद्भवली तर भारत पाकिस्तानला कोणतीही संधी देणार नाही. पहिले हल्ला न करण्याचं आपलं धोरण बाजुला ठेवून आधी भारतच पाकिस्तानवर अणु हल्ला करेल असं ते म्हणाले.
अणु हल्ला करताना पाकिस्तानच्या अणु केंद्रांना भारताकडून लक्ष्य केंद्र केलं जाईल. त्यामुळे भारताच्या कोणत्याही शहरावर अणु हल्ल्याचा धोका राहणार नाही आणि युद्धपरिस्थितीत भारताचं पारडं वर राहिल. पाकिस्तानला भारत संधी देणार नाही याचे पुरावे दिवसेंदिवस वाढत आहेत असं नारंग म्हणाले. आपल्या विधानाचा पुरावा म्हणून नारंग यांनी माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांच्या 'चॉइसेस : इनसाइड द मेकिंग ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी'चं उदाहरणही दिलं.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये काश्मीरच्या उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता यामध्ये अनेक भारतीय जवान शहिद झाले होते. त्यानंतर भारताकडून लष्कराने पहिल्यांदाच लाइन ऑफ कंट्रोल (LOC) ओलांडून पाक व्याप्त काश्मीरमध्ये (POK) घुसून दहशतवाद्यांचे 7 तळ उध्वस्त केले. या कारवाईत जवळपास 38 दहशतवादी ठार मारण्यात आले. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.