नवी दिल्ली : ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्रानंतर व्हिएतनामला नवे वरुणास्त्र नावाचा पाणबुडीविरोधी अग्निबाण देण्याची तयारी भारताने चालविली आहे. चीनला शह देण्यासाठी भारताने ही खेळी खेळली असल्याचे जाणकारांनी सांगितले. याशिवाय भारत व्हिएतनामी सैनिकांना पाणबुडी आणि सुखोई विमानांचे प्रशिक्षणही देणार आहे. सूत्रांनी सांगितले की, आशिया-प्रशांत क्षेत्रातील चीनच्या वाढत्या कारवायांमुळे भारत आणि व्हिएतनाम हे दोन्ही देश चिंतित आहेत. विशेषत: दक्षिण चिनी समुद्रात चीनने केलेले अतिक्रमण चिंताजनक आहे. याच्या जवळच व्हिएतनामच्या किनारपट्टीवर भारताचे तेल व गॅस संशोधन पट्टे आहेत. त्यामुळे चीनच्या कारवायांना लगाम घालणे भारतासाठी आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने व्हिएतनामशी लष्करी सहकार्य वाढविण्यावर भर दिला आहे. रशियाच्या सहकार्याने तयार केलेले ब्राह्मोस क्षेपणास्त्र व्हिएतनामला देण्यासाठी भारताने यापूर्वीच पुढाकार घेतला आहे. इंडोनेशिया, फिलिपिन्स यांच्यासह आखातातील तसेच लॅटीन अमेरिकेतील काही देशांनाही हे क्षेपणास्त्र भारत देणार आहे. ब्राह्मोसची मारक क्षमता २९0 किमी आहे. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण करारात (एमटीसीआय) ब्राह्मोसचा समावेश होत नाही. या करारात केवळ ३00 किमीच्या वर मारा करण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रेच येतात. त्यामुळे ब्राह्मोसच्या विक्रीचा पर्याय भारताजवळ उपलब्ध आहे. भारत नुकताच एमटीसीआयचा सदस्य झाला आहे. त्यामुळे ब्राह्मोसचे वाढीव पल्ल्याचे क्षेपणास्त्र भारत व्हिएतनामला देऊ शकणार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारत देणार व्हिएतनामला सागरी बाण
By admin | Published: July 03, 2016 1:35 AM