नवी दिल्ली, दि. 26 - भारत अफगाणिस्तानमध्ये लष्कराची तुकडी पाठवणार नाही, असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भारतानं अफगाणिस्तानाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहेत, गरज पडल्यास त्याचं आम्ही सविस्तर विश्लेषण करू. केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेच्या समोरच भारत अफगाणिस्तानात सैन्य पाठवणार नसल्याचं सांगितलं आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्लीच अफगाणिस्तानच्या नव्या रणनीतीची घोषणा केली आहे. या रणनीतीत भारत सर्वाधिक सक्रिय भूमिका निभावेल, अशी आशा व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारत अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठवेल, अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. गेल्या 16 वर्षांपासून संघर्षग्रस्त अफगाणिस्तानात भारतीय लष्करानं दखल दिली नव्हती. अमेरिकेच्या अफगाणिस्तान रणनीतीत पाकिस्तानची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.निर्मला सीतारामन आणि जेम्स मॅटिस यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पाकिस्तानच्या मुद्द्यावरही छेडले असता, पाकिस्तानचा मुद्दा भारतानं अमेरिकेसमोर उपस्थित केल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणा-या शक्तींना नेस्तनाबूत करू, असंही या संयुक्त पत्रकार परिषदेत विधान जारी करण्यात आलं आहे. जेम्स मॅटिस म्हणाले, दहशतवाद्यांना सुरक्षितरीत्या आश्रय देणा-यांना सहन केलं जाणार नाही. भारत आणि अमेरिका दहशतवाद संपवण्यासाठी संयुक्तरीत्या काम करेल.भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत शुक्रवारच्या भाषणात दहशतवादावरून वाभाडे काढले होते. जशास तसे उत्तर देण्याच्या नादात पाकिस्तानने रविवारी स्वत:ची चांगलीच फजिती करून घेतली होती.
अफगाणिस्तानात भारत सैन्य पाठवणार नाही, केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 5:52 PM