नवी दिल्लीः उत्तर काश्मीरच्या हंदवाडाजवळ एका गावात दहशतवाद्यांशी शनिवारी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद यांच्यासह पाच जवान शहीद झाले. तुमचं हे बलिदान कधीच विसरता येणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असताना, लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी पाकिस्तानला सज्जड दमच दिला आहे.
एकीकडे सगळं जग कोरोना नावाच्या अदृश्य शत्रूचा मुकाबला करतंय. पाकिस्तानवर तर जगापुढे हात पसरायची वेळ आलीय. तरीही, नियंत्रण रेषेवरच्या त्यांच्या कुरापती सुरूच आहेत. शस्त्रसंधीचं उल्लंघन दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा कट अशी आगळीक त्यांच्याकडून होतेय. हंदवाडामधील चकमकीआधी रामपूर सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचा भंग करत पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात आपल्या दोन जवानांना प्राण गमवावे लागले होते. त्याआधीही त्यांचे घुसखोरीचे प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावले होते. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानकडून होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या त्यांच्या प्रत्येक कारस्थानाला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, अशी आक्रमक भूमिका लष्करप्रमुखांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मांडली.
भारतात दहशतवादी पाठवण्याचा ठरलेला मर्यादित अजेंडा घेऊनच पाकिस्तानची वाटचाल सुरू आहे. कोरोनाशी लढण्यात त्यांना फारसा रस दिसत नाही. नियंत्रण रेषेवरील त्यांच्या कुरापती, शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना पाहता, ती एक वैश्विक जोखीम असल्याचं ठळकपणे जाणवतं. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसण्याचं कुटील कारस्थान बंद करत नाही, तोपर्यंत भारत त्यांना अगदी जशास तसं उत्तर देत राहील, असं जनरल मनोज नरवणे यांनी निक्षून सांगितलं.
पाकिस्तान कायमच आपण काश्मिरी जनतेचे मित्र असल्याचा दावा करतो. पण, पाकिस्तानने पोसलेले दहशतवादी काश्मीरमध्ये निष्पाप नागरिकांची हत्या करतात. कुठला मित्र अशा प्रकारे हत्या करतो आणि दहशत पसरवतो?, असा रोखठोक सवाल लष्करप्रमुखांनी केला. पाकिस्तान केवळ भारतातच नव्हे, तर अफगाणिस्तानातही दहशतवाद पसरवत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. 'टेरर वॉच लिस्ट'मधून कट्टर दहशतवाद्यांची नावं पाकिस्तानने हटवली आहेत. त्यातूनही त्यांची कुटील नीती स्पष्ट होते, याकडेही जनरल नरवणे यांनी लक्ष वेधलं.
हंदवाडा येथे नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी दहशतवाद्यांशी लढून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आणि दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या पाच वीर जवानांबद्दल भारतीयांना अभिमान असल्याचं सांगत लष्करप्रमुखांनी या जवानांचे आभार मानले.
आणखी वाचाः
बलिदान कधीच विसरता येणार नाही, पंतप्रधानांकडून शहीद जवानांना श्रद्धांजली
आशुतोष शर्मा यांचं वीरमरण देशाची मोठी हानी, ५ वर्षात पहिल्यांदाच सैन्यानं 'कर्नल' गमावला
काश्मीरच्या हंदवाडामध्ये लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच जण शहीद; दोन दहशतवादी ठार
हे बलिदान विसरता कामा नये; हंदवाडा चकमकीत शहीद जवानांना Virat Kohliसह क्रीडा विश्वातून मानवंदना
हुतात्मा मेजर अनुज यांचा 2 वर्षांपूर्वीच झाला होता विवाह, IIT सोडून निवडला होता NDAचा मार्ग