कटरा (जम्मू-काश्मीर) : सध्याचे २१ वे शतक ज्ञानाचे युग असून यात भारत जगावर राज्य करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभात व्यक्त केला.भारतात ३५ वर्षांखालील ८० कोटी युवक असून प्रत्येक युवकाचे स्वप्न हे देशाच्या प्रगतीची कहाणी ठरावे. २१ वे शतक हे ज्ञानाचे शतक असून त्याचे भारत नेतृत्व करेल. त्यासाठी ज्ञान हीच ऊर्जा असून ती भारताकडे आहे. गरिबांसाठी काही तरी करण्याची प्रतिज्ञा करू या. कारण गरीब वैष्णोदेवी यात्रेकरूंच्या योगदानातून हे विद्यापीठ उभे ठाकले आहे. लाखो यात्रेकरू खूप दूरवरून आले असतील. देशातील अन्य विद्यापीठे करदात्यांच्या(मातापित्यांनी दिलेले पैसे) पैशावर चालत असताना हे विद्यापीठ वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या लाखो गरीब यात्रेकरूंच्या पैशावर चालते हेच या विद्यापीठाचे वैशिष्ट्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.रुग्णालयाचे उद्घाटन...कटरालगतच्या काकरॅल येथे श्री मातादेवी नारायणा सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयाचे मोदींनी उद्घाटन केले. श्री मातादेवी देवस्थान मंडळाने ३०० कोटी रुपये खर्चून हे २३० खाटांचे रुग्णालय उभारले आहे. तेथे कॉर्डिओलॉजी, कॉर्डिओ-थोरॅसीस सर्जरीसह २० पेक्षा जास्त औषध आणि शस्त्रक्रिया शाखा आहेत. या रुग्णालयाच्या उद्घाटनाला राज्यपाल एन.एन. व्होरा, मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, उपमुख्यमंत्री निर्मलसिंग, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंग उपस्थित होते.दीपाने नाव सार्थ केले...रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या त्रिपुराच्या दीपा करमाकर या पहिल्या भारतीय महिला जिम्नॅस्टबाबत मोदींनी गौरवोद्गार काढले. दीपाने देशाची मान अभिमानाने उंचावताना स्वत:चे नाव सार्थ ठरविले आहे. निर्धारातून तिने हे यश मिळविले आहे. संसाधनांच्या कमतरतेचा अडसर तिने प्रगतीच्या आड येऊ दिला नाही, असे ते दीक्षांत समारंभात म्हणाले. (वृत्तसंस्था)
भारत जगावर राज्य करणार
By admin | Published: April 20, 2016 3:07 AM