नवी दिल्ली : शत्रूकडून होणा-या कोणत्याही प्रकारच्या हवाई हल्ल्यापासून सर्वंकष संरक्षण करू शकणा-या ‘एस-४०० ट्रायम्फ एअर डिफेन्स मिसाइल सीस्टिम’च्या खरेदीसाठी भारताने रशियाशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत.संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत अशा प्रकारच्या ५ हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी करणार असून, त्यासाठी ३९ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भारतास युद्धसज्जतेस आणखी बळकटी देण्यासाठी ही अत्याधुनिक हवाई सुरक्षा यंत्रणा लवकरात लवकर हवी असून, त्यासाठीचा औपचारिक करार याच वर्षी संपन्न व्हावा, असा प्रयत्न आहे. अशा प्रकारच्या यंत्रणेचा आणि अनुषंगिक उपकरणांचा पहिला संच करार झाल्यापासून दोन वर्षांत पुरविला जावा व सर्व पाचही संच एकूण ५४ महिन्यांत दिले जावेत, यासाठी भारत आग्रही असणार आहे.या यंत्रणेच्या खरेदीस संरक्षण खरेदी परिषदेने या आधीच मंजुरी दिली आहे. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र्र मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्या आॅक्टोबर २०१६ मध्ये गोव्यात झालेल्या शिखर बैठकीत दोन्ही देशांमध्ये विविध प्रकारच्या शस्त्रखेरदीसंबंधी जे सामंजस्य करार झाले, त्यांत याचाही समावेश होता.या हवाई सुरक्षा यंत्रणेच्या प्रत्यक्ष रणभूमीवर कठोर चाचण्या घेतल्यानंतर, आता खरेदीच्या व्यापारी पैलूंवर रशियाशी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. हा खरेदी करार प्रत्यक्षात जेव्हा होईल, तेव्हा तो रशियासोबत शस्त्रखरेदीच्या सर्वात मोठ्या करारांपैकी एक ठरेल.ट्रायम्फ यंत्रणेचीबलस्थाने-‘एस-४०० ट्रायम्फ’ हे परस्परपूरक अशा विविध प्रकारच्या सुरक्षा उपकरणांचे सामूहिक नाव आहे.ही यंत्रणा हल्ला करण्यासाठी येत असलेल्या शत्रूच्या बॉम्बफेकी विमानांचा, आवाजाविना उडणाºया लढाऊ विमानांचा, हेरगिरी विमानांचा, क्षेपणास्त्रांचा व ड्रोन्सचा ४०० किमी दूरवर आणि आकाशात ३० किमी उंचीपर्यंत शोध घेते, त्यांचा माग काढते व प्रतिहल्ला करून ते नष्ट करते.यात ग्राहकाला त्याच्या गरजेनुसार विविध पल्ल्याची प्रतिहल्ला करणारी क्षेपणास्त्रे मिळू शकतात. भारताची पसंती १२० ते ३७० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राला आहे.या संरक्षण यंत्रणेचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी लागणारी अनुषंगिक उपकरणे व त्यांची वाहतूक करणारी खास वाहनेही त्यासोबतच पुरविली जातात.या यंत्रणेतील लांब पल्ल्याची रडार १०० ते ३०० लक्ष्यांचा एकाच वेळी वेध घेऊ शकते.
अत्याधुनिक हवाई सुरक्षा यंत्रणेसाठी भारत करणार ३९ हजार कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 1:45 AM