ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 24 - आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकाकी पाडण्याबरोबरच अन्य लष्करी पर्यायांवरही भारत गांर्भीयाने विचार करत आहे अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी अमेरिकन सिनेटच्या सदस्यांना दिली. सिनेटच्या लष्करी सेवा समितीसमोर बोलताना विनसेंट स्टिवॉर्ट यांनी हा इशारा दिला.
आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून पाकिस्तानला एकाकी पाडण्याबरोबरच घुसखोरीला प्रोत्साहन देणा-या पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी भारत अन्य लष्करी पर्यायांवरही विचार करतोय असे विनसेंट म्हणाले. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी चौक्यांवर केलेल्या कारवाईचा व्हिडीओ भारतीय लष्कराने सार्वजनिक केल्यानंतर अमेरिकच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख विनसेंट यांनी हे विधान केले.
जमीन तसेच समुद्री सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारताकडून आपल्या लष्कराच्या आधुनिकीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे भारत-पाकिस्तानमधील व्दिपक्षीय संबंध पार बिघडून गेले आहेत असे विनसेंट म्हणाले. भारतावर दहशतवादी हल्ल्याचा धोका, काश्मीर खो-यातील हिंसाचार यामुळे हे संबंध अधिक बिघडू शकतात असे ते म्हणाले.
भारताने 9 मे रोजी सर्जिकल स्ट्राईकनंतरची दुसरी मोठी कारवाई करताना पाकिस्तानला जबर दणका दिला. गोळीला गोळीने उत्तर देण्याचे आपले धोरण बाजूला ठेवत भारतीय लष्कराने गोळीला तोफगोळयाच्या वर्षावाने उत्तर दिले. घुसखोरीला मदत करणा-या पाकिस्तानी सैन्यावर जरब बसवण्यासाठी लष्कराने घातक हत्याराचा उपयोग केला. एकापाठोपाठ एक स्फोट घडवून
पाकिस्तानी चौक्या आणि बंकर नष्ट केले.
यापूर्वी 29 सप्टेंबर 2016 रोजी भारताच्या पॅरा कमांडोंनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते तसेच त्यांचे तळही नष्ट केले होते. त्यानंतरही ही मोठी कारवाई समजली जात आहे. 1 मे रोजी पाकिस्तानी कमांडोंनी गस्तीवर असणा-या भारतीय जवानांवर हल्ला करुन त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली होती. पाकिस्तानच्या त्या नापाक हरकतीचा हा बदला आहे. प्रत्येकवेळी पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्याची आवश्यकता नाही. भारतात राहूनही पाकिस्तानला नेस्तनाबूत करता येते हे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिले.
काय केले भारताने
सीमेवर कुरापती काढणा-या पाकिस्तानला भारतीय लष्कराने चांगलाच धडा शिकवला आहे. जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीला मदत करणा-या पाकिस्तानी चौक्या भारतीय लष्कराने कारवाई करुन उद्ध्वस्त केल्या आहेत. मेजर जनरले अशोक नरुला यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती देताना कारवाईचा व्हिडीओही सार्वजनिक केला.