ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - वेळ आल्यास भारत पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर करू शकतो, असे वक्तव्य संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे. मात्र, भारत एक जबाबदार देश असून आम्ही अण्वस्त्रांचा बेजबाबदारपणे वापर करणार नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
निवृत्त ब्रिगेडियर गुरमीत कानवाल यांच्या ‘द न्यू अर्थशास्त्र’ या पुस्तकाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी प्रकाशन केले. या प्रकाशन सोहळ्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे. भारत पहिल्यांदा अण्वस्त्राचा वापर करणार नाही, असा समज आहे. पण या विचारात अडकून बसायचे नाही.
'वेळ आली तर भारत पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर करू शकतो. पण भारत एक जबाबदार देश असून, अण्वस्त्रांचा बेजबाबदारपणे वापर करणार नाही', असंही पर्रीकर म्हणाले आहेत. पर्रीकर यांच्या या विधानावरुन चौफेर टीका होऊ लागल्याने पर्रीकर यांनी 'हे माझे वैयक्तिक मत' असल्याचे स्पष्टीकरण देत सारवासारव केली.
याचवेळी 'आम्हाला कुणीही ग्राह्य धरु नये, देशावर जेव्हा कधी संकट येईल त्यावेळी मी आपल्या धोरणात बदल करण्यास मागेपुढे पाहणार नाही,असेही त्यांनी सांगितले. तसेच 'शेजारी राष्ट्र सर्जिकल स्ट्राईकपूर्वी वारंवार अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी देत होता. पण सर्जिकल स्ट्राईकनंतर त्यांच्या धमक्या बंद झाल्या आहेत', असा दावाही पर्रीकर यांनी केला आहे.
भारताच्या अण्वस्त्र धोरणात बदल झाल्याची टीका होऊ लागल्यानंतर, 'अण्वस्त्र धोरणात कोणताही बदल झालेला नाही', असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्टीकरण देत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.