न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (UNSC) अस्थायी सदस्य म्हणून (India member of UNSC) भारताची निवड करण्यात आली आहे. भारत २०२१-२२ पर्यंत संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च संस्थेचा अस्थायी सदस्य असेल. १९३ सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेनं आपल्या ७५ व्या सत्राचे अध्यक्ष, सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य आणि आर्थिक-सामाजिक परिषदेच्या सदस्यांची निवड केली. भारतासोबतच आयर्लंड, मेक्सिको आणि नॉर्वेची सुरक्षा परिषदेत निवड झाली आहे. कॅनडाला मात्र यामध्ये स्थान मिळालेलं नाही.भारत आपल्या कार्यकाळात बहुपक्षीय व्यवस्थेला नवी दिशा देण्याचं काम करेल, अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टी. एस. तिरूमूर्ती यांनी दिली. १९२ पैकी १८४ मतं भारताच्या बाजूनं पडली. २०२१-२२ साठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड केल्याबद्दल मला अतिशय आनंदी झाला आहे. आम्हाला मोठा पाठिंबा मिळाला. संयुक्त राष्ट्राच्या सदस्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे, असं तिरूमूर्ती म्हणाले.भारताची सुरक्षा परिषदेत झालेली निवड म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टी आणि जागतिक नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब असल्याचं तिरूमूर्तींनी म्हटलं. 'भारत अतिशय महत्त्वाच्या वेळी सुरक्षा परिषदेचा सदस्य झाला आहे. कोरोना संकटाच्या काळात आणि संकटानंतर भारत जगाला नेतृत्त्व देईल आणि बहुपक्षीय व्यवस्थेला नवी दिशा दाखवेल,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. २०२१-२२ कार्यकाळासाठी आशिया-पॅसिफिक विभागातील अस्थायी सदस्यत्वासाठी भारत उमेदवार होता. या विभागातील एकमेव उमेदवार असल्यानं भारताचा विजय निश्चित होता. चीन, पाकिस्तासह ५५ देशांनी आशिया-पॅसिफिक विभागातून भारताच्या उमेगवारीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भारताची निवड पक्की होती. त्यामुळे आजची निवडणूक ही केवळ औपचारिकता होती.