भारत तुमच्या पिताश्रींचा देश आहे का? फारुख अब्दुल्लांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 02:14 PM2018-02-08T14:14:06+5:302018-02-08T14:14:13+5:30
भारत माझाही देश आहे. या देशावर सर्वांचा हक्क आहे, असे फारुख अब्दुल्ला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
नवी दिल्ली: मुस्लिमांना भारतात राहण्याचा हक्क नाही, असे वक्तव्य करणारे भाजप खासदार विनय कटियार यांना जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी प्रत्युत्तर दिले. कटियार यांच्याबाबत बोलायचे झाले तर ते रोजच अशाप्रकारची विधाने करत असतात. हा तुमच्या पिताश्रींचा देश आहे का? भारत माझाही देश आहे. या देशावर सर्वांचा हक्क आहे, असे फारुख अब्दुल्ला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
कटियार अशाप्रकरची वक्तव्ये करून देशात फक्त द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. धर्म हा काही द्वेषाचा विषय नाही. याउलट धर्म प्रत्येकावर प्रेम करण्याचा आणि त्यांचा आदर करण्याची शिकवण देतात, असेही फारुक अब्दुल्ला यांनी म्हटले.
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणून हिणवणाऱ्यांना तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेचा कायदा करण्याची मागणी केल्यानंतर विनय कटियार आक्रमक झाले होते. मुस्लिम लोकसंख्येच्या आधारावर भारताची फाळणी करून वेगळा पाकिस्तान निर्माण करण्यात आला होता. मग मुस्लिमांनी भारतात राहण्याची आवश्यकताच काय आहे?, असा सवाल त्यांनी विचारला होता. तसेच मुस्लिमांना वेगळा भूभाग देण्यात आला असल्याने भारतामधील मुस्लिमांनी पाकिस्तान किंवा बांगलादेशात राहायला जावे, असेही कटियार यांनी म्हटले होते.
'हिंदू' असल्याचे मान्य असेल तरच मुस्लिमांनी भारतात राहावे- सुब्रमण्यम स्वामी
मुस्लिमांना भारतात राहायचे असेल तर त्यांना आपले पूर्वज हिंदू असल्याचे मान्यच करावे, असे वक्तव्य भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले होते. भारतात राहायचे असल्यास मुस्लिमांना काही अटी मान्य कराव्या लागतील. तुम्ही या देशाचे नागरिक असाल तर तुमचे पूर्वज हिंदूच होते, ही बाब तुम्हाला निर्विवादपणे मान्य करावी लागेल. मुस्लिमांचा मूळ डीएनए हिंदूंचाच आहे, यामध्ये कोणतीही शंका नसल्याचेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते.