नवी दिल्ली: गेल्या ११ दिवसांत तालिबाननंअफगाणिस्तानवर कब्जा केला. तालिबानच्या दहशतवाद्यांनी राजधानी काबुल ताब्यात घेतल्यानं परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेचं आव्हान मोदी सरकारसमोर आहे. एअर इंडियाच्या दोन विमानांना स्टँडबाय मोडवर ठेवण्याच्या सूचना मोदी सरकारनं दिल्या होत्या. मात्र अफगाणिस्ताननं हवाईहद्द बंद केल्यानं एअर इंडियाला उड्डाणं रद्द करावी लागली. यानंतर आता भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी हवाई दलानं सूत्रं हाती घेतली आहेत.
भारतीय हवाई दल पुन्हा एकदा परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी देवदूत ठरताना दिसत आहे. हवाई दलाच्या दोन सी-१७ ग्लोबमास्टर विमानांनी अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना एअरलिफ्ट करत आहेत. यातल्या एका विमानानं रविवारी रात्री उड्डाण केलं. सोमवारी सकाळी काही भारतीयांना घेऊन ते मायदेशी परतलं. आता दुसरं विमान लवकरच मायदेशी परतेल. या दोन्ही विमानांच्या अनेक फेऱ्या होतील आणि सर्व भारतीयांना सुखरुप माघारी आणलं जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली. सुरक्षेच्या कारणास्तव अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांची नेमकी संख्या सांगितली जात नाहीए.
अफगाणिस्तानात बरेच भारतीय अडकले आहेत. ते मायदेशी परतण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना लवकरात लवकर भारतात यायचं आहे. त्यांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलं असून एक किंवा दोन दिवसात त्यांना मायदेशात सुखरुप आणण्यात येईल, अशी माहिती सुत्रांच्या हवाल्यानं एएनआयनं दिली आहे. भारतीय नागरिकांसोबतच सरकार अफगाण शिख आणि हिंदू समुदायाच्या प्रतिनिधींच्यादेखील संपर्कात आहे. त्यांना अफगाणिस्तान सोडून भारतात यायचं असल्यास त्यांना मदत करण्यात येईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे.