नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती कायम असताना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत सज्ज आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने गुरुवारी रात्री पंजाब राज्यातील पाकिस्तान सीमेजवळ युद्धसराव करुन पाकिस्तानी सैन्याची झोप उडवली. या अभ्यासात मोठ्या प्रमाणात भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानाने भाग घेतला.
पंजाब राज्यातील पाकिस्तानच्या सीमेवर हवाई दलाचा युद्धसराव सुरु होता. या सरावादरम्यान आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज ऐकायला येत होते. त्यामुळे अमृतसर शहराजवळील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालं होतं. मात्र युद्धसरावाच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाने पंजाब आणि जम्मू काश्मीरलगत असणाऱ्या पाकिस्तानी सैन्यावर दबाव बनवण्याचे काम केले. ज्या ज्या ठिकाणाहून लढाऊ विमाने सराव करत होती त्या ठिकाणी स्फोटांचे आवाजाने पाकिस्तानच्या मनात धडकी भरत होती.
दरम्यान पंजाबच्या अमृतसर शहरातील लोकांना सुरुवातीच्या वेळी स्फोटांचे आवाज नेमके कुठून येत आहेत याचा काही थांगपत्ता नव्हता. सोशल मिडीयावर लोकांना अनेक शंका उपस्थित केल्या. प्रत्यक्षदर्शींनी रात्री प्रचंड प्रमाणात स्फोटांचा आवाज कानी पडत असल्याची माहिती माध्यमांना दिली. स्थानिक प्रशासन यांनी रात्री शहरात येऊन लोकांना कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहन केलं.
याआधीही बुधवारी पाकिस्तानचे लढाऊ विमान जम्मू-काश्मीर येथील एलओसीवर दिसण्यात आलं होतं. यानंतर भारतीय हवाई दलाई अलर्ट जारी केला. सुरक्षा मंत्रालयाच्या सूत्रांनुसार पुंछ परिसरात 10 किमी भारतीय सीमेत पाकिस्तान विमान आढळल्याचं समजलं होतं. 27 फेब्रुवारीला नौशेरा सेक्टरमध्ये आलेल्या पाकिस्तानी विमानाला भारतीय हवाई दलाने पळवून लावलं होतं. याच विमानाचा पाठलाग करत भारताचं मिग 21 विमान पाकिस्तानच्या हद्दीत गेलं होतं. त्यानंतर मिग 21 विमानाचा पायलट अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तान सैन्याने जेरबंद केलं होतं.
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सीमेत घुसून बालकोट भागात एअर स्ट्राइक केलं होतं. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला करत अनेक दहशतवादी मारल्याची माहिती सरकारने दिली. या एअर स्ट्राइकनंतर संपूर्ण देशभरात हवाई दलाच्या धाडसाचे कौतूक करण्यात आलं.