नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्याच्या दोन दिवसानंतरच आज भारतीय हवाई दलानं भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील जैसलमेरच्या पोखरणमध्ये युद्धसराव केला. पोखरण रेंजमध्ये करण्यात आलेल्या हा भारतीय हवाई दलाचा देशातील सर्वात मोठा युद्धाभ्यास आहे. या युद्धाभ्यासात 130 लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर, अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरचा समावेश होता. वायुशक्ती 2019या कार्यक्रमांतर्गत हे शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे. सरकारच्या आदेशाचे पालन करत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचं हवाई दलाचे प्रमुख बीएस धनोआ यांनी सांगितलं आहे.हवाई दल कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तयार असल्याचंही हवाई दलप्रमुख म्हणाले आहेत. विशेष म्हणजे या युद्धसरावादरम्यान क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही तिथे उपस्थित होता. हवेतून जमिनीपर्यंत मारा करणाऱ्या विमानांची ताकद यावेळी निदर्शनास आली. या युद्धाभ्यासात सुखोई-30, मिग-29, मिराज-2000, जग्वार, मिग-27 सारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानांचा समावेश होता. तसेच स्वदेशी बनावटीचं तेजस आणि अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असलेलं रुद्र या हेलिकॉप्टरनंही हवेत गोळीबार करून शक्तिप्रदर्शन केलं.
VIDEO: भारतीय हवाई दलाचा चित्तथरारक युद्धसराव, "कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यास तयार"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 8:51 PM