LCA Tejas : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने बुधवारी पहिले दोन आसनी (Two Seater) वजनाने हलक लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस हवाई दलाला सुपूर्द केले. कंपनीच्या बेंगळुरू येथील मुख्यालयाने सांगितले की या दोन आसनी विमानात हवाई दलाच्या प्रशिक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व क्षमता आहेत. इतकंच नव्हे तर आवश्यक असल्यास ते लढाऊ विमानाची भूमिका देखील बजावू शकते. 'एलसीए तेजस' हवाई दलाला सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमात संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमादरम्यान हवाई दलाचे एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी आदींच्या उपस्थितीत दोन आसनी एलसीए विमानाचे अनावरण करण्यात आले. तपासणीनंतर विमान सेवेसाठी (RSD) रुजू करण्यात आले.
दोन आसनी 'LCA तेजस' हे हलके, सर्व हवामानात प्रभावी आणि अनेक भूमिका सक्षमपणे पार पाडणारे ४.५ श्रेणीचे विमान आहे. एचएएलने सांगितले की, हे अद्यवायत संकल्पना आणि तंत्रज्ञानाचे मिश्रण आहे. कंपनीने म्हटले आहे की यासह भारत अशा उच्च क्षमतेच्या देशांच्या यादीत सामील झाला आहे ज्यांनी अशा क्षमता विकसित केल्या आहेत आणि संरक्षण दलांमध्ये समाविष्ट केले आहे.
'आत्मनिर्भर भारत'
हिंदुस्थान एरोनॉटिक्सने बनवलेले नवे तेजस हे 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमाचे आणखी एक उदाहरण आहे, असे कंपनीने सांगितले. HAL ने सांगितले की, 'आजची ऐतिहासिक घटना दोन आसनी LCA विमानाच्या उत्पादनातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. नवोदित वैमानिकांना दोन आसनी विमानाद्वारे लढाऊ वैमानिक म्हणून प्रशिक्षित करण्याच्या धोरणात्मक हेतूने तेजस तयार केले गेले आहे. भारतीय वायुसेनेने HAL कडून 18 दोन आसनी विमानांची मागणी केली आहे आणि 2023-24 दरम्यान त्यापैकी आठ विमाने देण्याची योजना आहे. उर्वरित 10 अनुक्रमे 2026-27 पर्यंत पुरवले जातील. हवाई दलाकडून आणखी ऑर्डर मिळण्याची अपेक्षा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.