मोगा - भारतीय वायू दलाचे MiG-21 हे लढाऊ विमान मध्यरात्री उशिरा कोसळून अपघात झाला. पंजाबच्या मोगा शहराजवळ ही दुर्घटना घडली आहे. नियमित प्रशिक्षणासाठी या विमानाने उड्डाण घेतले होते, त्याचवेळी विमानाला अपघात झाल्याची माहिती, वायू दलाकडून देण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार राजस्थानच्या सूरतगढ स्टेशनवरुन या विमानाने उड्डाण घेतलं होतं. पायलट अभिनव चौधरी यांनी सूरतगढवरुन जगरावच्या इनायतपुरा एअरबेससाठी उड्डाण घेतलं होतं. रात्री 9.30 वाजताच्या सुमारास या विमानाचा अपघात झाला. त्यामध्ये, पायलट अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाल्याची माहिती एसपी ( हेडक्वार्टर) गुरदीपसिंह यांनी दिली.
मोगापासून 25 किमी अंतरावरील लंगियाना खुर्द या गावाजवळ ही दुर्घटना घडली. वातावरण खराब असल्याने बचाव पथक रात्री 11.00 वाजता घटनास्थळी पोहोचले. प्रशिक्षणासाठी हे विमान उडविण्यात आले होते. मात्र, विमान चालवत असताना कोसळण्याची चाहूल लागल्याने वैमानिक अभिवन यांनी विमानातून उडी घेतली. मात्र, शिर धडापासून वेगळं झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. विमान दुर्घटना झालेल्या ठिकाणापासून 8 एकर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला.
गावातील नागरिकांना रात्री 9.30 च्या सुमारास मोठा आवाज आला. त्यामुळे, घाबरलेल्या ग्रामस्थांनी माहिती घेतली. त्यावेळी ही विमान दुर्घटना असल्याचे त्यांच्या लक्षात आले. काहींनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यावेळी, शेतजमिनीत 5 फूट खोलवर आत हे विमान शिरले होते. तर, विमानाचे तुकडे 100 फूट परिसरात पसरले होते.