गाझियाबाद - भारतीय हवाई दल कोणत्याही क्षणी युद्धासाठी तयार असल्याचं विधान एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांनी केलं आहे. हवाई दलाच्या 85वा स्थापना दिवसाच्या निमित्तानं ते बोलत होते. हवाई दलाच्या गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर आज मोठं शक्तिप्रदर्शनही करण्यात आलं आहे.यावेळी सुखोई, तेजस, मिराज, मिग, लढाऊ विमान सी-17, सी-130 यांसारखी विमानं व हेलिकॉप्टर या कवायतीमध्ये सहभागी झाली होती. एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांनी दिवंगत मार्शल अर्जुन सिंह यांच्या आठवणी जागवल्या. तसेच गुरुवारी दुर्घटनाग्रस्त झालेल्या एम-17 व्ही-5 हेलिकॉप्टरमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांनाही त्यांनी आदरांजली अर्पण केली.भारताला शेजारील देशांसोबत शांतता प्रस्थापित करायची आहे. मात्र गरज पडल्यास कुठल्याही क्षणी आम्ही नौदल व लष्करासोबत दोन्ही आघाड्यांवर लढण्यास सज्ज आहोत. युद्धासाठी आम्ही केव्हाही तयार आहोत, हेसुद्धा शत्रूंनी लक्षात ठेवावे, असं एअर चीफ मार्शल धनोवा म्हणाले आहेत.
भारतीय हवाई दल कोणत्याही क्षणी युद्धासाठी तयार, एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2017 5:33 PM