नवी दिल्ली - पाकिस्तानच्या ताफ्यात असलेली सगळी एफ-16 विमाने सुरक्षित असल्याचा अमेरिकन मासिकाने केलेला दावा भारतीय हवाई दलाने फेटाळून लावला आहे. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने केलेला प्रतिहल्ला परतवून लावत असताना विंग कमांडर अभिनंदन यांनी एफ-16 विमान पाडले होते. तसेच भारतावर हल्ला करण्यासाठी आलेल्या एफ-16 विमानांपैकी एक विमान परत माघारी फिरले नसल्याचे पाकिस्तानी हवाई दलाच्या रेडिओ संभाषणातून उघड झाले आहे, असा दावा हवाई दलाच्या सूत्रांनी केला आहे. 14 फेब्रुवारी रोजी काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत या हल्ल्याचा बदला घेतला होता. दरम्यान, 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसखोरी करून भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क असलेल्या भारतीय हवाई दलाने हा हल्ला हाणून पाडला होता. दरम्यान, यावेळी उडालेल्या हवाई चकमकीत मिग विमान चालवत असलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले होते.
ते एफ-16 विमान विंग कमांडर अभिनंदन यांनीच पाडले, हवाई दलाने फेटाळला अमेरिकन मासिकाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 7:38 PM