नवी दिल्ली - 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या हवाई चकमकीत एफ-16 विमान पाडले गेले नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानलाभारतीय हवाई दलाने जबरदस्त चपराक दिली आहे. एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांमध्ये झालेल्या हवाई चकमकीत पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले गेल्याचे पुरावेच भारतीय हवाई दलाने प्रसिद्ध केले आहे. तसेच हे एफ-16 विमान मिग-21 बिसॉन या विमानानेच पाडल्याचेही हवाई दलाने अधोरेखित केले आहे.
27 फेब्रुवारी रोजी झालेल्या हवाई चकमकीदरम्यान दोन विमाने कोसळली. त्यातील एक भारतीय हवाई दलाचे मिग-21 बिसॉन होते. तर दुसरे विमान पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-16 विमान होते. एअर व्हाइस मार्शल आरजीके कपूर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलांमध्ये उडालेल्या चकमकीचा वृत्तांत पुराव्यांसहीत सादर केला. यावेळी त्यांनी चकमकीदरम्यानच्या रडार इमेजही प्रसिद्ध केल्या.