नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायु सेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळापास 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, दहशवाद्यांवर कारवाई करताना भारतीय वायुसेनेने पाकिस्तानला मोठा चकवा दिला आहे. भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000' च्या 12 लढाऊ विमानांची हा हल्ला केला. मात्र, पाकिस्तानला हल्ला करण्यात येणार आहे, याचा सुगावा लागू नये म्हणून भारतीय वायु सेनेने देशातील 20 विमानतळांवरून 'मिराज'च्या विमानांचे उड्डाण केले. या मध्ये ग्वाल्हेर, भटिंडा, अंबाला या विमानतळांचा समावेश आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची, सर्जिकल स्ट्राइक-२ करण्याची तीव्र भावना देशभरातून व्यक्त होत होती. जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बवर्षाव करून भारताने आज पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय लष्कराच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.