ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ८ - जगभरात आज महिला दिन साजरा केला जात असताना भारतीय हवाई दलानेदेखील महत्वाची घोषणा केली आहे. 18 जूनला भारतीय हवाई दलाला पहिली महिला लढाऊ वैमानिक मिळणार असल्याची माहिती भारतीय हवाई दलाचे प्रमुख मार्शल अरुप रहा यांनी दिली आहे.
सध्या 3 महिलांचे प्रशिक्षण चालू आहे. प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरु आहे. त्यांचं प्रशिक्षण पुर्ण झालं की 18 जूनला पासिंग परडे होणार आहे. पासिंग परेड पुर्ण झाल्यानंतर त्यांना सेवेत घेतलं जाईल त्यानंतर त्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक असतील अशी माहिती अरुप रहा यांनी दिली आहे. यानंतर त्यांना प्रगत जेट प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येईल आणि त्यानंतर त्यांचा समावेश नियमित तुकडीत करण्यात येईल.
केंद्रीय सुरक्षामंत्र्यांचे मी आभार मानतो की त्यांनी महिलांचा लढाऊ वैमानिक म्हणून समावेश करण्याचा भारतीय हवाई दलाचा प्रस्ताव मान्य केला. आणि लवकरच भारतीय हवाई दलाला यावर्षी 18 जूनला आपली पहिला महिला लढाऊ वैमानिक मिळेल असं अरुप रहा बोलले आहेत. मार्चमध्येच अरुप रहा यांनी लढाऊ विमान उडवण्यासाठी महिला शारिरीकरित्या सक्षम नसल्याचं म्हणलं होतं.