Indian Air Strike on Pakistan: इंदिरा गांधींनंतर नरेंद्र मोदींनीच पाकिस्तानमध्ये घुसून दाखवले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 09:40 AM2019-02-27T09:40:58+5:302019-02-27T09:41:27+5:30
Indian Air Strike on Pakistan: हवाई दलाच्या १२ विमानांनी ४८ वर्षांनंतर एलओसी ओलांडली
हरिश गुप्ता
नवी दिल्ली : दहशतवाद्यांना जन्माला घालणारे कारखाने नष्ट करण्यासाठी हवाई दलाला नियंत्रण रेषा ओलांडण्याची परवानगी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या भारताचे आगमन झाल्याचा संदेश दिला. इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये पूर्ण युद्धाची घोषणा झाल्यावर पाकिस्तानच्या आत हवाई दलाला पाठवले होते. मोदी यांनी ती इच्छाशक्ती ४८ वर्षांनी दाखवत विमानांना एलओसीच्या आत जाण्यास मुभा दिली.
दहशतवादाविरुद्ध यापूर्वी विश्वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर, पी. व्ही. नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी एवढेच काय डॉ. मनमोहनसिंग यांनीही असा उपाय केला नव्हता. १९८९ मध्ये केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती महंमद सईद यांची मुलगी रुबियाच्या बदल्यात आठ दहशतवाद्यांना सोडण्यात आले. पंतप्रधान चंद्रशेखर यांनी १९९० मध्ये सैफुद्दीन सोझ यांच्या मुलीच्या बदल्यात जेकेएलएफच्या अतिरेक्यांना सोडले. १९९३ मध्ये नरसिंह राव यांनी हजरतबाल मशिदीत ओलिस प्रकरणात अतिरेक्यांना जाऊ दिले होते. १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानातील प्रवाशांच्या बदल्यात मसूद अझहर व तिघांना कंदाहारमध्ये नेऊन सोडले. त्याच मसूद अझहरने २00१ मध्ये संसदेवर हल्ला घडवून आणला. डॉ. मनमोहनसिंग यांना मुंबई हल्ल्यानंतर स्ट्राइक करायचा होता. परंतु, प्रत्यक्षात तसे घडले नाही.
जोखीम पत्करून कारवाई
उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी यांच्या विरोधकांनी सप्टेंबर २०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही या केलेल्या टीकेला ताज्या कारवाईमुळे पूर्णविराम दिला गेला आहे. मंगळवारचा हल्ला झाला हे पाकिस्ताननेही मान्य केले आहे.
१९८९ पासूनच्या पंतप्रधानांनी जे धाडस केले नाही ते मोदी यांनी करून दाखवले आणि परिणाम काहीही होवो नियंत्रण रेषेच्या आत शिरून हल्ला करण्यास मागेपुढे बघितले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पाकिस्तानला त्यांनी दिला आहे. आपण परिणामांची चिंता न करता मोठी जोखीम घेणारे आहोत हे मोदी यांनी दाखवून दिले आहे.