नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला अकरा दिवस पूर्ण झाल्यानंतर भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली. या कारवाईनं पुलवामात हल्ला घडवणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. भारतीय हवाई दलानं मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान अवघ्या 21 मिनिटांमध्ये जैशचा अल्फा-3 नियंत्रण कक्ष आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईनं पाकिस्तानात भूकंप झाला. भारतीय हवाई दल पाकिस्तानच्या हद्दीत 40 किलोमीटर अंतरापर्यंत आत येऊन बॉम्बफेक करुन गेलं आणि पाकिस्तानला प्रतिहल्लाचीही संधी दिली नाही. यामुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली. पाकिस्तानच्या सुरक्षा दलानं काल रात्री एक ट्विट केलं होतं. तुम्ही निर्धास्त झोपा, पाकिस्तान हवाई दल जागं आहे, असा मजूकर या ट्विटमध्ये होता. रात्री 12 वाजून 6 मिनिटांनी हे ट्विट करण्यात आलं. यानंतर अवघ्या 3 तासांमध्ये भारतीय हवाई दलाची विमानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसली आणि त्यांनी बॉम्बफेक केली. विशेष यावेळी पाकिस्तान हवाई दल प्रतिहल्ला करण्याच्या तयारीत होतं. मात्र अवघ्या 21 मिनिटांमध्ये भारतीय वैमानिकांनी लक्ष्याचा अचूक वेध घेतला. यावेळी पाकिस्तानच्या हवाई दलातील F16 विमानं प्रत्युत्तर देतील, असा अंदाज होता. मात्र भारतीय हवाई दलाची ताकद आणि आक्रमक पवित्रा पाहून F16 विमानांनीच धूम ठोकली.कारगिल युद्ध गाजवणाऱ्या मिराज 2000 विमानांनी मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडत धडाकेबाज कारवाई केली. हवाई दलानं बालाकोट, मुजफ्फराबाद आणि चकोठीतील दहशतवादी तळांवर अचूक बॉम्बफेक केली. यावेळी जवळपास 1000 किलोंचे बॉम्ब फेकण्यात आले. भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांनी अतिशय धाडसी मोहीम फत्ते केली. यानंतर सोशल मीडियावर सर्जिकल स्ट्राइक 2 ट्रेंडमध्ये होता. भारत आणि पाकिस्तानातील अनेकांनी ट्विट करुन त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पाकिस्तानातील काहींनी भारतावर टीका केली. तर काहींनी पाकिस्तान सरकार आणि सुरक्षा दलांना धारेवर धरलं. भारतीय विमानं पाकिस्तानच्या हद्दीत येऊन बॉम्बफेक करुन निघून गेली. त्यावेळी तुम्ही झोपला होतात का?, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला.